अहमदनगर (प्रतिनिधी) – रगडा कचोरीचे पैसे मागणाऱ्या भेळ विक्रेत्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरमध्ये घडला आहे. ही घटना काल रात्री पावणे नऊच्या सुमारास सावेडीतील गुलमोहोर रोडवरील पारिजातक चौकात घडली. या प्रकरणी आज तोफखाना पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारिजात चौकाजवळ सचिन प्रकाश कसबे यांचा भेळ गाडा आहे. या गाड्यावर काल रात्री पावणे नऊच्या सुमारास एका व्यक्तीने रगडा कचोरी खाल्ली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला कसबे यांनी रगडा कचोरीचे तीस रुपये मागितले. या गोष्टीचा राग आल्याने संबंधित व्यक्तीने प्रशांत खरमाळे नावाच्या व्यक्तीला फोन केला. त्यानंतर प्रशांत खरमाळे तेथे आला व त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी भेळ विक्रेते कसबे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कोयत्याने कसबे यांच्या हातावर वार केला. भेळ गाडीवरच्या खुर्च्यांची सुद्धा मोडतोड केली.
या घटनेमध्ये कसबे हे जखमी झाले असून, त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून प्रशांत खरमाळे व त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, अद्याप एकाही आरोपीला अटक केली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.







