जळगाव (संपादक सुनिल पाटील) – एकनाथराव खडसे हे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा मजकुराचा मॅसेज सोशल मीडियात फिरत असतांना मुक्ताईनगर तालुक्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. ‘भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण… तुम्ही ठरवाल तेच धोरण असा मजकूर टाकून आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचे बॅनर झळकले आहेत, तसेच आज पहाटे एकनाथराव खडसे यांनी ट्विटरवर ना.जयंत पाटलांचे ट्वीट रिट्वीट केल्याने, एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. काही जणांचे म्हणणे आहे की, नाथाभाऊ मनाने केव्हाच राष्ट्रवादीत पोहचले आहेत.
तसे पाहिले तर आतापर्यंत एकनाथ खडसे हे भाजप पक्ष सोडलेला नाही असं म्हणत होते. पण आता त्यांनी स्वत: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं पंतप्रधान मोदींवर टीका करणारं ट्विट रिट्विट करुन राष्ट्रवादीत जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे समर्थकांकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर मात्र भाजप पक्षाचे कोणतेही चिन्ह नाही. मुक्ताईनगरमधील खडसेंच्या फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढली आहे. खडसेंच्या प्रवेशाबाबत त्यांचे विश्वसनीय समर्थकांचे म्हणणं आहे की, लवकरच एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाबाबत टीका करणारे केलेले ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट्वीट करत पाटील यांच्या मुद्द्याला आपला पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षपणे दर्शवून दिले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा रात्री आठच्या सुमाराला देशाला मार्गदर्शन करत असतात. पण काल त्यांनी सायंकाळी सहा वाजता देशाला उद्देशून भाषण केले. अनेकांना वाटले काही तरी मोठी घोषणा होणार आहे. पण प्रत्यक्षात कोणतीच घोषणा न देता कोरोनाच्या नियमांचे पालन करा आणि स्वतःसह इतरांची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला. मोदींचे भाषण सर्वसाधारणतः २० ते २५ मिनिटांचे असते. पण कालचा संदेश पाच मिनिटांतच संपला.
त्यावरुन जयंत पाटील यांनी त्यावर टीका करणार ट्वीट केले. ”भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!,” असे ट्वीट पाटील यांनी काही तासांपूर्वी केले होते. हेच ट्वीट ‘रिट्वीट’ करत खडसेंनी याला आपला पाठिंबा असल्याचे दर्शवून दिले आहे.
मात्र दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडूनही खडसेंना थोपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पक्ष सोडून जावू नये यासाठी चर्चा केली. याला खडसे यांनीही दुजोरा दिला. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. हा फोन खडसे यांचा राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश रोखण्यासाठीच असावा, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.







