चोपडा (नंदलाल मराठे) – वृत्तपत्र सृष्टीत भास्कर समुह हा मोठा असा ग्रुप आहे.या समूहाचे कितीतरी भाषेत वृत्तपत्र छपाई होऊन दररोज अनेक राज्यामध्ये ते वितरीत होते.अगदी कोरोना या संसर्गजन्य आपत्कालीन परिस्थितीत देखील या समूहाने या परिस्थितीशी दोन हात करीत आपले वाचकांची पाने संख्या ही कमी केली नाहीत.अर्थात ही त्या समूहाची जमेची बाजू आहेच यात शंका नाही.भास्कर समूहाचा अग्रगण्य दैनिक ‘दिव्य मराठी’ हा जळगाव जिल्ह्यात अल्पावधीतच नावारूपाला आला.नावारूपालाच नव्हे तर जिल्ह्यातील साऱ्याच दैनिकांना या वृत्तपत्राने धोबी पछाड केले आणि परंपारेगत आपल्या नावाचा ठसा उमटविणारे अनेक पेपरांना दैनिक दिव्य मराठी या पेपराने स्वबळावर वाचकांमध्ये लोकप्रियतेसाठी खुले आव्हान दिले.खरं तर या वृत्तपत्राची लढाई ही वाचकांच्या बातम्या व त्यांच्या आवडी निवडी या लिखाणाशी होती.मात्र प्रतिस्पर्धी वृत्तपत्र यांचे मालक यांनी जणू दिव्य मराठी हा आपला अजात शत्रू आहे या अविर्भावात ज्या त्या जिल्ह्यातील संपादकांना व वार्ताहरांना याचे डोस पाजले.याचाच परिणाम म्हणून आज तारखेला दिव्य मराठी व प्रतिस्पर्धी वृत्तपत्र यांचे आभाळा एवढे फाटले आहे.
दैनिक दिव्य मराठीच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक, प्रकाशक, वार्ताहर यांच्या विरोधात प्रशासनाने नुकताच गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनातील त्रुटी या वृत्तपत्राने दाखवून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे या समूहाकडून तूर्तास सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद सायबर सेलने दिव्य मराठीचे संपादक प्रकाशक वार्ताहार यांच्याविरुद्ध विविध सहा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे हे जरी सत्य असले तरी हा म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून वजा पत्रकार जगतातून उमटत आहेत. ही लोकशाही आहे की आणीबाणीचा काळ आहे असा प्रश्न आता यानिमित्ताने समोर येत आहे.सत्यता चव्हाट्यावर आणल्याने गुन्हे दाखल करून माध्यमांची गळचेपी करण्यात येत आहे अशा प्रकारे गुन्हा दाखल करून सत्य माध्यमांचा आवाज मुळीच बंद होणार नाही हे शास्वत सत्य आहे.
स्वातंत्र्य पूर्वी काळात ब्रिटिशांनी ज्या प्रकारे सर्वसामान्य लोकांमध्ये जाती भेद,वर्ण भेद,गोर गरीब,अशा भेदभावाचे घाणीरडे द्वेष पसरविले व त्याचे राजकारण केले तेच राजकारण आज वृत्तपत्र सृष्टीत देखील करण्यात येत आहे.त्यावेळी ब्रिटिशांचा मुख्य उद्देश हा आपणास पारतंत्र्यात ठेवण्याचा होता तर आज वृत्तपत्र समूहाचा उद्देश हा आपले दैनिकाचे स्वातंत्र्य इतर दैनिकाने हिरावून नेऊ नये एवढाच आहे.याचाच अर्थ वाचकांनी फक्त ठराविक वृत्तपत्र वाचावे व अमुक ढमूक वृत्तपत्र वाचू नये असा बोध आहे! त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिव्य मराठी या वृत्तपत्र समूहावर झालेला गुन्हा होय.सांगण्याचे तात्पर्य असे आजमितीस संपादक, प्रकाशक व पत्रकार यांच्यावरील दाखल झालेले संशयित गुन्हे संदर्भात वार्तांकन फक्त ‘फेकमत’ सारख्या पगारी व हाडाचे रोजगारी नोकर उपसंपादकांच्या ठिसूळ डोक्यात येते.गत काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील एका सायं दैनिकाच्या संपादक व नुकतेच चार दिवसांपूर्वी एका साप्ताहिकाच्या संपादक यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होतो व त्या संशयितास जणू तो किती मोठा खंडणी बहाद्दर आहे असे ‘फेकमत’ या डबघाईला आलेल्या(पाने कमी झाले म्हणून हा शब्द प्रयोग)पांढऱ्या पेशीच्या वृत्तपत्रातून जनतेसमोर मांडण्यात येते आणि या घटनेबरोबरच ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्राच्या संपादक, पत्रकार यांना याच वृत्तपत्रातून टार्गेट करण्यात येत असेल तर वाचक देखील एवढे दुधखिळे नाही.दिव्य मराठी या वृत्तपत्राने बातमी दिली व त्याविरुद्ध प्रशासनाने गुन्हा दाखल केला यात वृत्तपत्र नजरेतुन मला तरी काही वेगळे वाटत नाही. कारण ही आता तरी न्यायप्रविष्ट बाब आहे.परंतु आपल्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्र समूहाची आपण कशी जिरवली याचाच वास मला त्या बातमीतून येतो हे मात्र तेवढेच खरे!







