आमच्यातले ‘ रावण दहन ‘….!

ravan-dahan

शाम जाधव (पत्रकार)
आज विजयादशमी आजच्या दिनाला दसरा म्हणून साजरे करण्याची संस्कृती सनातन धर्मात फार पूर्वी पासून आहे .देवीने महिषासुर या राक्षसाशी युद्ध करून त्याला मारले .तोच हा दिवस , प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला तोच हा दिवस .या दिवसाला अनन्य साधारण महत्व हिंदू धर्मात आहे .लहानपणी दसरा म्हणजे नवीन कपडे ,आणि नातेवायिकांकडे पाया पडायला गेल्यावर मिळणारे गोड बत्ताशे किंवा मिळणारे पैसे या निरागस लोभापायी झाडून साऱ्या नातलगांच्या पायांवर डोके ठेवणारे ते बालपण कधीच हरवले .आज प्रत्येकाच्या हातात कमी -अधिक पैसे आहेत पण …ज्यांच्या चरणांवर डोके ठेवून नतमस्तक व्हावे असे पाय आज उरलेले नाहीत .जसजसे मोठे होत गेलो ,तसतसे दसरा म्हणजे ‘ रावण दहन ‘हे नवीन आकर्षण निर्माण होत गेले अगदी भारत भर आजच्या दिवशी रावण दहन मोठ्या उत्साहात होते ( या वर्षी कदाचित कोरोना मुळे होणार नाही .) रावण दहन त्या – त्या ठिकाणी गावचा प्रमुख , राजकारणी , उद्योगपती ,तत्सम इसमांच्या हस्ते केले जाते .हे सर्वज्ञात आहे .त्याला रावण दहनाचा मान हे गोंडस नाव देखील दिले जाते .रावण दहन यांच्या हस्ते होत असताना काही प्रश्न जे तेंव्हा मनात यायचे ते आजही येतात , कदाचित ते तुमच्याही मनात येत असावेत .प्रभू श्रीराम चंद्रांनी रावणाला मारले , त्या मागे रामायण होते .रावणाला मारण्यासाठी रामाला जन्म घ्यावा लागला होता .आज जे काही प्रतिष्ठित रावण दहन करतात , त्यांच्या हातून हे कार्य व्हावे इतकी पात्रता , इतकी मर्यादा यांच्यात आहे ? रावणाला मारणे आणि दहन करणे म्हणजे मस्करी वाटली की काय ? …….

 

रावण , दशानंन , लंकेश ,लंकापती , अशा एका पेक्षा एक भारदस्त नावांनी ओळखला जाणारा आणि ज्याला स्वतः शंकराने ‘ रावण ‘ हे नाव दिले तो एक राक्षस असला तरी तो ब्राम्हण , महापंडित ,महाज्ञानी , कुशल राजा, ब्रम्हज्ञानी ज्योतिष ,तांत्रिक ,सांगित तज्ञ , वास्तुशास्त्र जाणकार ,परमप्रतापी योद्धा ,युद्धकला निपुण
आणि भगवान शंकराचा परमभक्त होता . रावणानेच शिवतांडव स्तोत्र – शिव संहिता याची रचना केली आहे .राक्षस सम्राट असूनही असे म्हणतात की , सौर मंडलाचे संपूर्ण ग्रह सारे तारे रावणाच्या इशाऱ्यावर चालायचे .चारही वेद सहा उपनिषदे यांचे संपूर्ण ज्ञान रावणाला होते .रामाहून अधिक व श्रेष्ट विद्या रावणाने आपल्या तपस्येतून प्राप्त केली होती .रावणाचे जीवन समजण्यासाठी – अभ्यासण्यासाठी मानवाला आणखी जन्म घ्यावा लागेल .सिता हरण ही एक चूक सोडली तर रावण रामा पेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नव्हता .रावण हा दशानंन (दहा तोंडं असणारा ) नावानेही वाखाणला जायचा .त्याला दहा तोंडं असली तरी तो एकमुखी होता .पण आज त्याचे दहन करणारे एक मुख असूनही एकमुखी आहेत का ? एकाच तोंडाने आम्ही कित्ती शब्द फिरवतो ? रावण एकदाच जन्मला ..एकदाच मेला ..आणि एकवेळीच त्याचे दहन झाले

 

आजचे रावण दहन म्हणजे रावण वृत्ती ,रावण प्रवृत्तीचे दहन असे आम्ही मानतो .इथपर्यंत ठीक आहे पण ज्यांच्या – ज्यांच्या हस्ते या वृत्तीचे दहन करतो आहोत त्यांच्यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा एकतरी गुण आहे का ? असा प्रश्न समोर जळणारा रावण विचारत नसावा का ? अहो ..यांच्या पेक्षा जास्त श्रीमंत जास्त प्रगल्भ ,जास्त शूर जास्त पराक्रमी जास्त चारित्र्यवान माणसं रावणाच्या सैन्यात सैनिक म्हणून आणि रावणाच्या सोन्याच्या लंकेत घरकाम करायला होती .कुबेर हा रावणाचा भाऊ होता उगाचंच रावणाकडे सोन्याची लंका नव्हती .असुरांचा राजा असला तरी तो प्रजा प्रिय राजा होता .सिता हरण ,गर्व-अहंकार या दोन चुकीच्या निर्णयांनी रावणाच्या ,अधोगतीची अधःपतनाची सुरुवात झाली .आपण आजही सहज एक वाक्य बोलून जातो …अरे रावणाचा गर्व टिकला नाही ;दुसऱ्याचे काय ? गर्वाने … सोन्याची लंका उध्वस्त झाली तर तुमच्या आमच्या कडे आहे तरी काय ? रावण दहन ज्याच्या हातून आहे अशा प्रत्येकाने एकदा घरी आरशा समोर उभं रहावं ! .. आणि ठरवावं रावणाचे दहन त्याच्या हातून होऊ शकते का ?
ती आपली लायकी आहे का ? रावण शब्दाचा पक्का होता . रावणाच्या कैदेत असूनही माता सिता सुखरूप आणि पवित्र होती .कारण रावणाने प्रण घेतला होता, जोवर सिता स्वतः आत्मसमर्पण करणार नाही तोवर तीला स्पर्श करणार नाही ….! रावणाचे दहन मानवाच्या हातून शक्य नाही . कारण रावण होणे हेही आता शक्य नाही .आपल्याला दहनच करायचे असेल तर आपल्यातील रावणाचे करा ! आपल्यात जी अपप्रवृत्ती आहे .जे असुरी विचार आहेत त्यांचे दहन आज करा .ते सगळ्यांना सहज शक्य आहे .मी लेख लिहितो , समाज जागृतीचा संदेश देतो .म्हणजे मी फार धुतल्या तांदळाचा आहे , साधू – संत आहे असे नाही ; हे पत्रकार म्हणून ठीक आहे पण शेवटी मी सुद्धा माणूसच आहे.माझ्यातही काही अवगुण नक्कीच आहेत पण ते कबूल करायची हिंम्मत आणि स्वतःला बदलवायची मानसिकता देखील माझ्यात आहे .मी तर आज पासून स्वतःतील वाईट विचारांचे दहन आज पासून करणार आहे !तुम्ही बोला करता आज पासून आपल्या स्वतःतील रावणाचे दहन… प्रभू श्रीरामचंद्र आपणा सर्वांना आपल्यातील कु प्रवृत्ती दहनाचे सामर्थ्य देवो हीच प्रभू चरणी प्रार्थना व आपणा सर्वांना विजयादशमी च्या खूप – खूप शुभेच्छा
( आजचा लेख डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा असला तरी सत्य परिस्थितीवर आधारीत आहे .त्याचा व्यक्तिशः कोणाशीही थेट समंध नाही . असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा )
अध्यक्ष – प्रेरणा दर्पण फाऊंडेशन चोपडा (मोबाईल 9822325717)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here