जळगाव (संपादक सुनिल पाटील) – माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, विजय दोधा पाटील, डॉ. सरोज पाटील व शिवराम पाटील यांनी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
महसूल प्रशासनातील अनागोंदीच्या विरोधात दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर येथील थोरातांचे संपर्क कार्यालय आणि मुंबईतील काँग्रेस कार्यालयासमोरही आमची उपोषणाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. महसूल खात्यातील गैरव्यवहाराबद्दल बोलताना या उपोषणकर्त्यांनी सांगितले कि नागपूर प्रशासकीय न्यायाधिकरणाने नुकताच निकाल दिला कि, कोणतीही तक्रार नसलेल्या ,कार्यकाळ पुर्ण न झालेल्या ४० उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्या महसूलमंत्री थोरात यांनी केल्या.त्या बदल्या नागपूर मैट हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवल्या.वैयक्तिक स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करून महाराष्ट्र गव्हर्मेंट सर्व्हंटस रेग्युलेशन आणि ट्रान्सफर एक्ट २००५ चे उल्लंघन केलेले आहे. महसूलमंत्री थोरात यांच्या सहीने झालेल्या बदल्यांच्या विरोधात नागपूर प्रशासकीय विभागातील ४ उपजिल्हाधिकारी आणि ८ तहसीलदारांनी मैट मधे धाव घेतली होती.
या बदल्या करू नयेत असे स्पष्टपणे नागरी सेवा मंडळाने महसूल विभागाला कळवले होते. तरीही थोरांतांनी या बदल्या केल्याच कशा? याचे उत्तर जनतेला दिलेच पाहिजे. नाहीतर थोरात हे जनतेची,सरकारची फसवणूक करीत आहेत म्हणून राजीनामा द्यावा असेही ते म्हणाले .
महसूल खाते हे प्रशासनाचे प्रमुख खाते आहे. थोरातांनी रूसजन फुगून महसूल खात्याचे मंत्री पद मिळवले.पण कशासाठी? जनतेच्या सेवेसाठी कि वैयक्तिक आर्थिक हितासाठी?हे थोरातांनी जनतेला सांगावे.नसेल तितके नैतिक बळ तर राजीनामा द्यावा. ना.थोरात यांनी एक वर्षात महसूल खात्याचे कोणतेही विधायक काम केले नाही.कोणतेही विधेयक विधानसभेत मांडले नाही. सरकारी मानधन,गाडी,भत्ता,सेक्युरीटी ची रक्कम बेकार घालवली. असे अकार्यक्षम मंत्री हवेत कशाला?
बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री आहेत.यानिमीत्ताने ते शासकीय कार्यालय, वाहने,मानधन,सेक्युरीटी यांचा उपयोग करीत आहेत.त्यांनी पुर्णवेळ शासनाची जबाबदारी स्विकारली म्हणून त्यांना मानधन दिले जाते.ते मानधन म्हणजे सप्रेम भेट नाही. खैरात नाही. भिक्षा नाही. तो आहे कामाचा मोबदला.मग हाच मोबदला घेऊन ते कांग्रेस प्रदेश अध्यक्ष या पदावरून पक्षासाठी काम करीत आहेत.हा शासकीय मानधन, वाहन,सेक्युरीटी याचा गैरवापर होत आहे. एकतर पुर्णवेळ मंत्री म्हणून काम करावे किंवा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेचे काम करावे.
जळगाव जिल्ह्यातील महसूल खात्यातील भ्रष्टाचार बाबत तक्रारी करण्यासाठी आम्ही संगमनेर पर्यंत थोरांतांचा पाठलाग केला.पण भ्रष्टाचार लपवण्याच्या हेतूने किंवा नैतिक बळ नसल्याने थोरातसाहेबांनी पळ काढला. नागरिकांना भेटत नाहीत. भीतीने पळ काढतात.माहिती लपवण्याचा हा प्रयत्न आहे.हे मंत्रीपदास अशोभनीय आहे.थोरातसाहेब सर्वाधिक अकार्यक्षम मंत्री आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.







