खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील हजरत ख्वाजा ज़र ज़री ज़रबक्ष यांच्या 734 व्या उरुसनिमित यावर्षी 24 ते 30 ऑक्टोबरदरम्यान उरूस मैदानावर शुकशुकाट होती.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हजरत ख्वाजा ज़र ज़री ज़रबक्ष यांच्या 734 व्या उरुसनिमित यावर्षी 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान उरूस मैदानावर शुकशुकाट पहायला मिळाली. यंदा उरुसात दुकाने बंद असल्याने दरवर्षी होणारी लाखोंची उलाढाल थांबली. खुलताबाद उरुसानिमित कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ‘कोरोना’मुळे यंदा उरूस मैदानावर दुकाने लावण्यास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे खुलताबादकरांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला.
दरवर्षी खुलताबाद उरुसानिमित्त उरूस मैदानावर मोठा उत्साह अनुभवास मिळतो. प्रसाद म्हणून खाजा या पदार्थाच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते; तसेच विविध खाद्यप्रकार मनोरंजनाची साधने, सौंदर्य प्रसाधने, गृहउपयोगी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते. खुलताबादेत अनेकांच्या घरी पाहुण्यांचा राबता असतो. शहरातील रस्ते लोकांनी गजबजलेले असतात, मात्र यंदा ‘कोरोना’मुळे अवघे चित्रच बदलले आहे.
मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत दर्ग्यात धार्मिक विधी कार्यक्रम पार पडला असून, दर्गा परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स 22 ते 30 ऑक्टोबरदरम्यान बंद ठेवण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांनी दुकानदारांना दिल्या होत्या.
खुलताबाद येथील ज़र ज़री ज़रबक्ष यांच्या उरुसासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. यावर्षी ‘कोरोना’मुळे उरूस भरणार नसल्याचे प्रशासन व दर्गा कमिटीने यापूर्वीच जाहीर केले होते. दर्गा परिसरातील दुकाने व हॉटेल बंद असून, खुलताबाद पोलिस प्रशासनाने दर्ग्याकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड लावून बंद केले होते. शासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत कायदा व सुव्यवस्थेचे उल्लघंन होणार नाही, यासाठी उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष प्रभारी तहसीलदार प्रभाकर गवळी, सचिव मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे, दर्गा कमिटीचे अध्यक्ष फजीलत अहेमद, महंमद शरफोद्दीन रमजानी, नगराध्यक्ष एस. एम.कमर, माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन, नगरसेवक मुनिबोद्दीन, प्रा. शेख हुस्नोद्दीन आदींनी परिश्रम घेतले.
ईद-ए-मिलाद आणि खुलताबादचे विशेष महत्त्व
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांच्या 1400 वर्षांपूर्वीचा पवित्र पोशाख गेल्या 700 वर्षांपासून खुलताबाद येथील हजरत ख्वाजा सय्यद जैनोद्दीन शिराजी दर्गामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. जगभरातील मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी हा सण व हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खुलताबाद येथे चांगल्या अवस्थेत जतन करून ठेवलेला हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ) यांना अल्लाहने शब-ए-मेहराजच्या रात्री भेट दिलेला पवित्र पोशाख चांदीच्या पेटीतून बाहेर काढून मखमली आच्छादनावर दर्शनासाठी ठेवला जातो. बावीस ख़्वाजा दर्गा समोर असलेल्या हजरत ख्वाजा बुऱ्हानोद्दीन यांच्या दर्गात मु-ए-मुबारक (मिशीचा केस) ठेवलेला असतो. यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविकांना यावर्षी पैहरान ए मुबारक (पवित्र पोशाखाचे) व मु-ए-मुबारक (मिशीच्या केसाचे) दर्शन घेता आले नाही. खुलताबाद येथे या दर्गा परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.







