जळगाव (निलेश पाटील) – जिल्ह्यात कोरोना बाधीतांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने 7 ते 13 जुलैपासून जळगाव महापालिका क्षेत्र, भुसावळ, अमळनेर पालिका क्षेत्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज घेतला आहे. 7 जुलैच्या पहाटे पाचपासून 13 जुलैच्या रात्री 12 पर्यंत लॉकडाउनचे आदेश काढण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अधिक तिव्रतेने पसरत आहे. 4000 वर कोरोना रुग्ण झाले असल्याने चिंता वाढली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून पुर्णतः लॉकडाउन करणे अत्यावश्यक झाल्याने आदेश काढण्यात आले आहेत. आदेशानुसार ठरलेल्या कालावधीत नागरीकांना फक्त दोन किमी परिसरातील औषधी, दुध घेण्यासाठी परवानगी असेल. नागरीकांना दुचाकी, तिनचाकी, चारचाकी वाहने वापरण्यास देखील बंदी आहे. एमआयडीसीतील कंपन्यांसाठी होणारी वाहतुक केवळ सुरू राहणार आहे. जळगाव, भुसावळ व अमळनेर शहर वगळता ग्रामीण भागात व इतर पालिका क्षेत्रात सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत.
जळगाव, भुसावळ, अमळनेर येथील बाजार समितीत केवळ घाऊक व ठोक विक्रीचे व्यवहार सुरू राहतील. किरकोळ खरेदी विक्री करणाऱ्यांना बाजार समितीत परवानगी असणार नाही. रूग्णांना डॉक्टरांची गरज असेल तरच वास्तव्यास असलेल्या प्रभागाच्या बाहेर जाता येणार आहे. शेतीच्या कामांसाठी बि- बियाणे, किटकनाशके खरेदी करणे यासाठी संबंधीत क्षेत्राबाहेर जाता येईल. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा सात-बारा उतारा जवळ बाळगावा लागणार आहे. लॉकडाउन लावण्यात आलेल्या क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांना फक्त अत्यावश्यक सेवांच्या व्यक्तींना पेट्रोल, डिझेल विक्रीची परवानगी आहे.
हे असेल बंद …
लॉकडाउनच्या काळात किराणा दुकान, लिकर शॉप, सलुन दुकाने, खासगी कार्यालय, कुरिअर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, गॅरेज/वर्कशॉप आदी दुकाने उद्याने बंद राहतील.
हे असेल सुरू ..
मेडिकल स्टोअर, हॉटेल/रेस्ट्रॉरंट (पार्सल सुविधा), ओपीडी, दुध खरेदी विक्री केंद्र, कृषी संबंधीत कामे, कृषी केंद्र, शासकिय कार्यालय, बॅंका.







