रॅपिड ॲंटीजन टेस्ट व आरटीपीसीमधील सर्व १५० अहवाल निगेटिव्ह.
भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – कुऱ्हे पानाचे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ५० वर्षा वरील नागरिकांसाठी विशेष स्वॅब तपासणी शिबीराचे आयोजन मंगळवार (दि.३) रोजी करण्यात आले होते. त्यातील ९५ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट . तर ५५ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. अशा एकूण १५० जणांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली.
त्यातील रॅपिड ॲंटीजन टेस्ट मधील सर्व ९५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला. तर ५५ जणांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोणा नियंत्रणासाठी शासनाकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान राबवण्यात येत आहे. या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींची व इतर आजार असणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअंतर्गत भुसावळ पंचायत समिती विभागामार्फत गटविकास अधिकारी विलास भटकर यांच्या उपस्थितीत कुऱ्हे पानाचे आरोग्य उपकेंद्रात १५० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
५० वर्षावरील व्यक्तीसह लहान मुलांनी सुद्धा आपली कोरोना चाचणी करून घेतली. लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी गट विकास अधिकारी विलास भटकर यांनी मुलांना बिस्कीटचे पुडे वाटुन त्यांना प्रोत्साहन दिले. कुऱ्हे पानाचे येथील आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रिया बोंबटकार यांनी स्वॅब घेतले.







