सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – कुपवाड येथील लाडनगर परिसरात असलेल्या वेश्या अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
एजंट आप्पा विठ्ठल कर्चे (वय 30), दीपाली हनुमानराम जाट (26, रा. दोघे लाडनगर, कुपवाड ) अक्षय अनिल हात्तेकर (26, रा. मालगाव) त्याशिवाय त्या ठिकाणी ग्राहक म्हणून गेलेला प्रकाश अशोक खोत (36, रा. पंढरपूर रोड मिरज) या संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मायादेवी काळगाचे यांच्या पथकास कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत एक वेश्या अड्डा सुरू आहे, अशी माहिती मिळाली. एक महिला व दोन पुरुष लाडनगरमधील त्यांच्या घरी ग्राहकांना मागणीनुसार वेश्या व्यवसायाकरिता मुली पुरवितात अशी माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी बोगस ग्राहक (पंटर) पाठवून पोलिसांनी छापा टाकला.तेथील दोन पिडीत मुलींची सुटका केली. आप्पा कर्चे, दीपाली जाट अक्षय हात्तेकर यांनी संगनमताने मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावला. त्यांच्या कमाईवर ते उदरनिर्वाह करीत असल्याचे स्पष्ट झाले.
सहाय्यक पोलिस निरीक्षक काळगावे, विकास पाटणकर, रुपाली क्षीरसागर, अभिजीत गायकवाड, कविता पाटील, अनिता गायकवाड, यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.







