भाजपचे जिल्हा कार्यालय मध्यरात्री दिले पेटवून

bjp-jalgaon-office

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – भाजपचे जळगाव येथील जिल्हा कार्यालय काल (दि.८) मध्यरात्री एका माथेफिरुने पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. माथेफिरुने हे कृत्य केल्याचा संशय असून, शहर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

 

जळगाव शहरातील बळीराम पेठेत भाजपचे ‘वसंत स्मृती’ हे जिल्हा कार्यालय आहे. हे कार्यालय शनिवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले. या घटनेत कार्यालयाचा मुख्य दरवाजा जळून खाक झाला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेबाबत भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दरवाजासमोरील कचरा जाळल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता भाजपच्या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे.

 

हा प्रकार एका माथेफिरूने केल्याचा संशय आहे. मागच्या आठवड्यात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीप्रसंगी या माथेफिरूने शिवीगाळ करत दगडफेकही केली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयित माथेफिरुला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here