भोपाळ – मध्य प्रदेशात अवघ्या पाच हजार रुपयांच्या विवादात एका आदिवासी तरुणाला जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडलीय. अवघ्या पाच हजार रुपयांच्या वादात ‘वेठबिगार’ म्हणून राबणाऱ्या तरुणाला ही क्रूर शिक्षा देण्यात आली. भारतात वेठबिगारी संपुष्टात आणण्यासाठी १९७६ मध्ये कायदा अस्तित्वात आला. परंतु, २०११ सालीदेखील जनगणनेत देशात १ लाख ३५ हजार वेठबिगार मजूर आढळले होते. वेठबिगारीतून मुक्त करण्यात आलेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी दिशानिर्देशाचीही तरतूद कायद्यात करण्यात आलीय. परंतु, दुर्दैवाने’वेठबिगारी’ कायद्यानं गुन्हा ठरवण्यात आल्याच्या चार दशकानंतरही वेठबिगारीच्या घटना घडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
मृत तरुणांचं नाव विजय सहारिया असून तो मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील गुना बमोरी भागातील खुर्द गावात राहत होता. उल्लेखनीय म्हणजे, बमोरी हा भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या पंचायत राज मंत्री महेंद्र सिसोदिया यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे, या प्रकरणात काँग्रेसनंही उडी घेत पीडितांना न्याय देण्याची मागणी केलीय.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विजय सहारिया याच्या कुटुंबात आई, छोटा भाऊ, पत्नी आणि दोन मुलं आहेत. विजयनं तीन वर्षांपूर्वी राधेश्याम लोढा नावाच्या व्यक्तीकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते. या बदल्यात तो गेल्या तीन वर्षांपासून राधेश्यामच्या शेतात मजुरी करत होता. कामाचा मोबदला म्हणून राधेश्यामकडून त्याला कोणताही पगार दिला जात नव्हता. पगार मागितल्यावर त्याला मारहाण केली जात असे.राधेश्यामकडून विजयला पाच हजार रुपयांच्या बदल्यात गेल्या तीन वर्षांपासून ‘बेठबिगार’ म्हणून राबवत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी आणि पीडित कुटुंबानं केलाय.
पगार मागितल्यानंतर झालेल्या वादात आरोपींनी विजयच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्त नरेंद्र सलूजा यांनी केलाय. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलीय. सोबतच, शिवराज सिंह सरकारमध्ये गरीब आणि दलितांच्या शोषणाचंच हे एक उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलंय.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. सरकारकडून मृताच्या कुटुंबाला २० हजार रुपयांची तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली. तर आणखी साडे आठ लाख रुपये देण्यात येतील, असं सांगण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन पीडित कुटुंबाला दिलंय.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बमोरीमध्ये तरुणाला रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम ३०७ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली तसंच आरोपीला अटक करण्यात आलीय.







