खैनीची तलफ आल्याने त्याने चक्क साखळी घेचून थांबवली रेल्वे

tobacco-eating

वाराणसी – एरवी आपण रेल्वेची साखळी खेचून रेल्वे थांबवल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पण ही एक अशी घटना आहे जी ऐकून आपणही चकित व्हाल. हा प्रकार उत्तर प्रदेशातील वाराणसीचा आहे जिथे रेल्वे अचानक थांबली आणि मात्र यामागचे कारण कळल्यानंतर सर्व प्रवासी चकित झाले. कारण कळल्यानंतरही सुरुवातीला रेल्वे प्रशासनालाही हसावं की रडावं हे कळेना. झाले असे की एका प्रवाशाला खैनीची तलफ लागल्याने, त्याने साखळी खेचून ट्रेन थांबवली.

 


अचानक रेल्वे थांबल्याने रेल्वे प्रशासनही सक्रीय झाले आणि रेल्वेची साखळी कोणी आणि का खेचली हे शोधू लागले. दैनिक जागरणने दिलेल्या माहितीनुसार गोरखपूरचा रहिवासी असलेला बिल्ला नावाचा एक इसम रेल्वेने प्रवास करत होता आणि प्रवास सुरू असताना त्याला खैनीची तलफ आली. पण त्याच्याकडे खैनी नव्हती. तेव्हा त्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि सराय कंसराय स्थानकाजवळ त्याने रेल्वेची साखळी ओढली आणि खैनी घेण्यास गेला.

 


रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बिल्ला हा दादर-गोरखपूर कोव्हिड स्पेशल रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करत होता. जेव्हा रेल्वेला उशीर झाला तेव्हा गार्डने आपल्या वायरलेसवरून सूचना दिली. रेल्वेतील आरपीएफचे जवान बाहेर आले तेव्हा त्यांनी खैनी खरेदी करून परतणाऱ्या बिल्लाला ताब्यात घेतले आणि ही रेल्वे गाडी वाराणसीला पोहोचल्यावर त्याला दंड ठोठावला. आरोपीच्या विरोधात इतरही कारवाई केली जात आहे. यादरम्यान रेल्वेतील इतर प्रवाशांनी बिल्लावर बरेच तोंडसुख घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here