लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न देण्याची मागणी

lalkrushna-advani

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे दुसरे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनासुद्धा ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात यावे अशा मागणीला जोर धरू लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते डीएच शंकरमूर्ती यांनी अडवाणी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली आहे.

 

 


शंकरमूर्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. ‘अडवाणी हे मागच्या सात दशकांपासून समाजकारणात सक्रिय आहेत. RSS, जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मातृभूमीसाठी, देशासाठी केलेला त्याग आणि योगदान अभूतपूर्व आहे. सार्वजनिक जीवनात एक निष्कलंक आणि प्रामाणिक नेता अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींवर त्यांची चांगली पकड आहे. त्यांचा अभिमान वाटावा अशी त्यांची प्रतिमा आहे.’ असे शंकरमूर्तींनी पंतप्रधान मोदीनां लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

 


लोकांची आणि हजारो कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे की, अडवाणी यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले पाहिजे. ते या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती आहेत. कर्नाटकमधील हजारो कार्यकर्त्यांच्या या मागणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचार करावा अशी विनंती शंकरमूर्तींनी आपल्या पत्राच्यामाध्यमातून केली आहे.

 


दरम्यान, परवा लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. यादरम्यान भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित होते. यानंतर घराच्या लॉनवर पंतप्रधान मोदींनी अडवाणींसोबत केक कापला होता तसेच त्यांनी अडवाणींना केकही भरवला होता. यावेळी त्यांच्यात दीर्घ चर्चाही झाली. इथे अडवाणींच्या कन्या प्रतिभा अडवाणीही उपस्थित होत्या.


याशिवाय भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही अडवाणींच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत लिहिले, ‘आदरणीय अडवाणीजींनी आपल्या परिश्रम आणि निस्वार्थ सेवाभावाने फक्त देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदानच दिलेले नाही, तर भाजपाच्या राष्ट्रवादी विचारसरणीच्या विस्तारातही महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या वाढदिवशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ईश्वराकडे त्यांचे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याची कामना करतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here