सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – चोरी, जबरी चोरी, लुटमार, घरफोडीच्या गुन्ह्यात पसार असलेल्या अट्टल चोरट्यांच्या तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
अजय बापू कांबळे (वय 23, रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी, जुना बुधाव रस्ता, सांगली), बापू ऊर्फ विश्वनाथ दिलीप काळे (30), गेंडा ऊर्फ आकाश संतोष जाधव (रा. वाल्मिकी आवास) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त अधीक्षक मनीषा दुबुले यांनी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मागावर होती.
यातील टोळीप्रमुख अजय कांबळे भारती हॉस्पिटलजवळ थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर बापू काळे आणि गेंडा जाधव या साथीदारांसमवेत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. अजय कांबळेच्या कबुलीनंतर पथकाने त्याच्या दोन्ही साथीदारांनाही वाल्मिकी आवास योजना परिसरातून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडेही कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी खुनाचा प्रयत्न, दुचाकी चोरी, जबरी चोरी, घरफोडी असे नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली. कोल्हापूर जिल्ह्यातही त्यांनी चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. यातील अजय कांबळे याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या तर काळे आणि जाधव यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक अभिजित सावंत, जितू जाधव, मेघराज रूपनर, इम्रान मुल्ला, प्रवीण यादव, सूरज पाटील, शशिकांत जाधव, संदीप गुरव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.







