मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांची नाट्यगृह, नाटक आणि नाट्य व्यवसाय सुरू करण्या संदर्भात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या वतीने कलाकार, निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांनी भेट घेतली. यावेळी विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन राज ठाकरे यांच्या कार्यशैली प्रमाणे काही बाबतीत त्यांनी ताबडतोब फोनवर चर्चा करून त्या त्या विषयांना दिशाही दिली. तसेच वर्तमान पत्र जाहिरात दर 50% करण्यासाठी त्या पत्र प्रमुखांना फोन करून ‘निर्णय घ्याच’ अशी सूचना केली.
नाटकांच्या बसेस आणि टेम्पोंना टोल माफी देण्या संदर्भात त्या संबंधी मंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्याशी फोन वर चर्चा करून टोल माफीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले आणि ‘माफीचा निर्णय घ्यावा अशी विनंती केली.’
नाट्य व्यवसाय सुविहीत होण्यासाठी नाट्यगृह भाडे आणि स्वच्छता या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्यास भाग पाडू असे रंगकर्मींना आश्वासन दिले. फक्त नाट्यगृह सुरू करून नाटक होणार नाही, ५०% प्रेक्षक क्षमतेत म्हणजे प्रत्यक्षात अवघ्या २०० – ३०० प्रेक्षकांच्या आर्थिक गणितात हा व्यवसाय कसा सुरू करायचा हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झालाय.
संपूर्ण महाराष्ट्रात हजारो कुटुंब नाटक व लोककलेच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करतात. या कुटुंबांना व्यवसाय सुरू करून आधार देणे गरजेचे आहे. याच उद्देशाने माननीय राज ठाकरे यांची झालेली भेट नाटकांना उत्साहवर्धक दिशा देणारी ठरेल याची रंगकर्मीनां खात्री आहे. यावेळी अमेय खोपकर, प्रशांत दामले, महेश मांजरेकर, दिलीप जाधव, विजय केंकरे, अजित भुरे, सुनील बर्वे, वैजयंती आपटे, चंद्रकांत लोकरे, श्रीपाद पद्माकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, कविता मेढेकर, विशाखा सुभेदार, ह्रता दुर्गुळे, अतुल परचुरे, संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, पंढरीनाथ कांबळे, अभिजित गुरू, विजय पाध्ये, विनय येडेकर, संकर्षण कऱ्हाडे आदी पदाधिकारी व कलाकार उपस्थित होते.







