येरवडा कारागृहातील प्रकार : जेवणाची थाळी डोक्यात मारुन केले जखमी
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – चोरी कशी करायची याची पध्दत न शिकविल्याचा राग आल्याने येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये एका कैद्याने दुसर्या कैद्याच्या डोक्यात जेवण्याची थाळी मारली.
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात तजेस तुकाराम येनपुरे (वय १९) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कैदी सोहेल शेख हा जखमी झाला आहे. याप्रकरणी जेलमधील कर्मचारी सत्वशील पाटील (वय ३०, रा.येरवडा वसाहत) यांनी फिर्याद दिली आहे.
घटनेबाबत गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांनी सांगितले की, येनपुरे व शेख दोघांनाही वेगवेगळ्या गुन्ह्यांत तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री येनपुरे शेखला ‘चोरी कशी केली’ हे वारंवार विचारत होता. त्यावर शेखने येनपुरेला घटना सांगितली. मात्र त्याने ‘तू खोटे बोलत आहेस’, असे सांगून वाद घातला. पुढे या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर येनपुरेने शेखच्या डोक्यात ऍल्युमिनिअमची थाळी मारली. ज्यात शेख जखमी झाला आहे.







