कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडीजवळ जय हिंद धाब्यावर थांबलेल्या ट्रकमधून सुमारे 33 लाख 28 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. याबाबतची फिर्याद ट्रकमालक महंमद सिकंदर कुरेशी (वय 42, रा. न्यू संतन डी. एस. गुरुप्पन पल्लय बी.जी. रोड बंगळूर, कर्नाटक ) यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
कुरेशी यांचा खाटिक व्यवसाय असून विक्रीसाठी बकरी आणण्यासाठी ते ट्रकने (ए.के. 51 ए.बी.3205) बंगळूरमार्गे अहमदनगरला जात होते. कणेरीवाडीजवळील जय हिंद धाब्यावर जेवण करण्यासाठी सोबत असलेल्या दोन ट्रकचालकांसह नऊ जणांबरोबर मंगळवारी रात्री साडेअकराच्या ते सुमारास उतरले. उतरताना ट्रकच्या केबिनच्या काचा व दरवाजा बंद केल्याची खात्री करून घेतली. जेवण झाल्यानंतर केबिन उघडण्यासाठी गेले असता दरवाजा उघडा व काच हाललेली दिसली. केबिनमध्ये जाऊन चालकाच्या मागील सीटखाली ठेवलेले 33 लाख 28 हजार रुपये नसल्याचे निदर्शनास आले. तत्काळ त्यानी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात येऊन घडला प्रकार सांगून फिर्याद दिली.
स.पो.नि. सुशांत चव्हाण घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला. अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, डी.वाय.एस.पी अमृत देशमुख यांनी बुधवारी घटनास्थळी पाहणी केली. श्वानपथकाला पाचारण करण्यात आले, पण श्वान तेथेच घुटमळत राहिले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन औद्योगिक वसाहती असून, या परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहते. मागील चार वर्षांपूर्वी महाराजा हॉटेलवर सलग दोन वर्षे शर्मा ट्रव्हल्समधून दोन कोटींचा मुद्देमाल लंपास झाला होता.







