कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – महापालिकेत नोकरी लागण्याच्या आशेने दिलेले पैसेही परत मिळत नसल्याच्या नैराश्यातून तुषार उदय रोडे (वय 28, रा. मंडलिक गल्ली, मंगळवार पेठ) या तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सुलोचना वसंत सावंत (54) या महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. तिला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
तुषार रोडे याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. त्याच्या वडिलांची मंगळवार पेठेत घराशेजारी पिठाची गिरणी आहे. गुरुवारी रात्री त्याने घराच्या टेरेसवर दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार समोर आला. त्याच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी आढळली. या चिठ्ठीत संशयित सुलोचना सावंत हिला 2017 साली नोकरी लावण्यासाठी दिलेल्या रकमेचा उल्लेख होता. तसेच मृत्यूला सावंत हिला कारणीभूत ठरवावे, असाही उल्लेख आढळून आला.
संशयित सुलोचना सावंत ही रोडे यांच्या गिरणीमध्ये येत असे. यातूनच तिने तुषारला महापालिकेत नोकरीला लावतो, असे सांगून 2017 मध्ये आठ लाख रुपये घेतले होते. सावंत ही स्वत: महापालिका आरोग्य विभागात काम करत असून सध्या सावित्रीबाई रुग्णालयात नेमणुकीला आहे. तिने घेतलेल्या 8 लाखांपैकी काहीच रक्कम परत केली होती. पण उर्वरित रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू होती, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली.
याबाबत तुषार याचे वडील उदय रोडे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयित सावंत हिच्या विरोधात फसवणूक व मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तिला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. आर्थिक फसवणूक झाल्याच्या नैराश्येत तुषार गेले काही दिवस अस्वस्थ होता. गुरुवारीही तो मोबाईल घेऊन वारंवार टेरेसवर जात होता, असे नातेवाईकांनी सांगितले.







