जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जागतिक महिला दिवस कधी असतो याचं उत्तर आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. पण जागतिक पुरुष दिन कधी असतो या प्रश्नाचं उत्तर देताना विचार करावा लागेल किंवा माहितही नसेल. जागतिक पुरुष दिन 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. म्हणजेत आज जगभरात जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात येत आहे.
अन्याय फक्त स्त्रीवर होतो आणि तिलाच मानसिक आधाराची गरज असते या ठराविक मांडणीतून बाहेर येऊन पुरुषावर होण्याऱ्या अन्यायाचीही तितक्याच संवेदनशीलपणे नोंद घेण्याची गरज असल्याचे मत जागतिक पुरुष दिनानिमित्त व्यक्त केले जात आहे. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अनेक पीडित पुरुषही दिसतील. शोषण, पक्षपात, हिंसा, असमानता याची झळ पुरुषांनाही बसते. पुरुषांचं मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजातील आदर्श पुरुषांना मुख्य प्रवाहात आणणं आणि लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
जगभरातील 60 पेक्षा जास्त देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. 1999 मध्ये पहिला पुरुष दिन साजा करण्यात आला. भारतात त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2007 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला होता. ‘पुरुष आणि मुलांचे उत्तम आरोग्य’ ही यंदाच्या पुरुष दिनाची थीम आहे.
सर्वसामान्य जीवनातही पुरुषांबाबत फारसा विचार होत असल्याचे आढळत नाही.त्यामुळेच बस, रेल्वे यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांसाठी विशेष आरक्षण, सुविधा उपलब्ध केल्या जातात. मात्र, पुरूषांसाठी असा कोणताही विचार होत नाही. पुरुषांच्या हक्कांबाबत काम करणाऱ्या ऑल इंडिया मेन्स वेलफेअर असोसिएशनने महिला विकास मंत्रालयासारखे पुरूष विकास मंत्रालय असे स्वतंत्र मंत्रालय असावे, अशीही मागणी केली आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.स्त्री आणि पुरुष हे दोघे समान आहेत, दोघे मिळून घर चालवू शकतात, स्त्रीला जसे रडू येते तसेच पुरूषही रडू शकतो त्यालाही भावभावना असतात या विचारांचा स्वीकार अलीकडे भारतीय समाज करत आहे. नवऱ्यापेक्षा बायको जास्त कमवते मात्र अशावेळी स्त्रीचे कर्तृत्त्व स्वीकारण्यापेक्षा पुरूषाला दुर्बलतेची दूषणे लावण्याचे प्रकार समाजात घडतात. हे टाळणेही गरजेचे आहे.
एकीकडे धावती लाईफस्टाईल, वाढती स्पर्धा, त्यातून येणारे नैराश्य, विभक्त कुटुंबपद्धती, वाढलेल्या सोशल मीडियाचा वापर आणि कमी झालेला संवाद यामुळे दाम्पत्यांमध्ये वाद वाढून वैवाहिक जीवन अडचणीत येत आहे. अशावेळीही अनेकदा फक्त पुरुषाला जबाबदार धरलं जाण्याची उदाहरणंही बघितली जातात. मुळात सर्व पुरुष किंवा स्त्रिया निर्दोष नाहीतच पण फक्त तो पुरुष आहे म्हणून काहीही जाणून न घेता त्याला संशयित म्हणून बघणे चुकीचे आहे, यामुळे कुटुंबव्यवस्था धोक्यात येताना दिसत आहे. शहरात घडणाऱ्या उदाहरणांपैकी बोलायचे झाल्यास दोघांच्या जाडजूड पगारामुळे अतिआत्मविश्वास आणि हट्टीपणा यांच्यातून विसंवाद वाढतो. बरेचसे कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे अशावेळी त्यांचाही दुरुपयोग करून नवऱ्याला आणि कुटुंबियांना अडचणीत आणण्याची उदाहरणे नवीन नाहीत.
अनेकदा पुरुषांच्या समस्यांवर चर्चा होत नाही. ‘अरे तू पुरुष आहेस ना, पुरुषासारखा पुरुष तू बांगड्या भर, अरे रडायला तू काय बाई आहेस का’ अशा शब्दांनी अक्षरशः हिणवून आणि मानसिक आधार देण्याऐवजी खच्चीकरण झाल्याने अनेक तरुण आणि पुरुष तणावात असताना आत्महत्येचा अंतिम पर्याय स्वीकारतात. जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेल्या २०१६ च्या अहवालानुसार भारतात दर दहा हजार पुरुषांमध्ये २५८० पुरुष हे आत्महत्या करतात. भारतात पुरुषांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे २५.८% आहे. यात १५ ते २९ वर्षांच्या मुलांचा आणि पुरुषांचा समावेश आहे. तर महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण हे १६.४ % आहे.
1923 मध्ये काही पुरुषांनी आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या धर्तीवर 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. यानंतर 1968 मध्ये अमेरिकेतील पत्रकार जॉन पी. हॅरिस यांनी एका लेखात म्हटलं होतं की, सोव्हिएत प्रणालीत संतुलनाची कमतरता आहे. ही प्रणाली महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरी करते, पण पुरुषांसाठी कोणत्याही प्रकारचा दिवस साजरा केला जात नाही. यानंतर 19 नोव्हेंबर 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला. डॉ. जीरोम तिलकसिंह यांनी पुरुषांचं योगदान मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हापासून 19 नोव्हेंबरला संपूर्ण जगात त्यांच्या वडिलांच्या जन्मदिवसाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा केला जातो.
परदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. भारतात आता कुठे या दिवसाला प्रसिद्धी मिळाली आहे. जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरातून करा. घरातील पुरुष सदस्यांना ते खास असल्याची जाणीव करुन द्या. त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवा, गिफ्ट द्या किंवा छान मेसेज असलेलं कार्ड देऊनही तुम्ही हा दिवस साजरा करु शकता.







