मालदा जिल्ह्यातील सुजापूर परिसरातील प्लास्टिक कारखान्यात स्फोट; पाच लोकांचा मृत्यू

malada-blast

मालदा (पश्चिम बंगाल) – मालदा जिल्ह्यातील सुजापूर बसस्थानक परिसरातील प्लास्टिक कारखान्यात स्फोट होऊन पाच लोकांचा मृत्यू झाला. तर, 10-12 लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी मृत्यूंची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना घटनास्थळावरून हलवण्यात आले असून त्यांना मालदा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. सुजापूर परिसरात सकाळी 11.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

“कारखान्यातील चार कामगार जागीच ठार झाले आणि एकाचा रुग्णालयात आणल्यानंतर मृत्यू झाला. स्फोटात पाच इतर गंभीर जखमी झाले आहेत,” ते म्हणाले. पोलीस अधीक्षक आलोक राजोरिया यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत कारखान्याच्या अवजड यंत्रातील तांत्रिक बिघाडामुळे जबरदस्त स्फोट झाला. प्लास्टिक तयार केले जात असताना हा स्फोट झाला. आम्ही सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करीत आहोत. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळाला भेट देईल, असे ते म्हणाले.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांनी याबाबतच निवेदन जारी केले आहे.

 

टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यमंत्री फिरहद हकीम यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठवले आहे. दरम्यान, राज्यपाल जगदीप धनखार यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पक्षपातहीन तपासणी करण्यास सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here