कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – खटाव आणि माण तालुक्यातील प्रत्येकी दोघांना गांजा तस्करीप्रकरणी अटक केल्यानंतर आता गांजा जेथून पुरवठा केला जातो, त्या ठिकाणी म्हणजेच काळमळ (पिलीव) (ता. माळशिरस) येथे आयपीएस रितू खोखर यांच्या पथकाने बुधवारी रात्री धडक कारवाई करत गांजा तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाख 95 हजार 410 रुपये किमतीचा 49 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सूत्रधाराला कोरेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दि. 13 रोजी सायंकाळी सातारा-लातूर महामार्गावर दुचाकीवरून गांजा तस्करी केल्याप्रकरणी परिक्षाविधीन पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या पथकाने हसिम नजीर झारी व सचिन तुकाराम मदने (दोघे रा. पुसेगाव) यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 4 किलो 185 ग्रॅमचा गांजा व मोबाईल असा 77 हजार 830 रूपयांचा ऐवज जप्त केला होता.
त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी दहिवडीतील बाजार पटांगणाजवळ राहत असलेल्या सुनील किसन जाधव व प्रकाश अशोक जाधव यांच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली होती. रितू खोखर यांच्या पथकाने त्याच रात्री दहिवडीत धडक कारवाई करत दोघांना अटक केली. त्यांच्या घर झडतीमध्ये 63 हजार 570 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यांच्या विरुध्द कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती.
तपासादरम्यान दहिवडीतील दोघांनी काळमळ (पिलीव), ता. माळशिरस येथील लक्ष्मण रामू जाधव याच्याकडून गांजा खरेदी करत असल्याचे सांगितले. या माहितीवरून खोखर यांच्या पथकाने बुधवारी रात्री काळमळ (पिलीव) येथे छापा टाकून जाधव याला ताब्यात घेतले.त्याच्याकडून 2 लाख 95 हजार 410 रुपये किंमतीचा 49 किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षाविधीन पोलिस अधीक्षक रितू खोखर, पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे, हवालदार विजय जाधव, पोलीस नाईक धनंजय दळवी, अमोल सपकाळ, किशोर भोसले, कर्मचारी साहिल झारी, इंद्रजित भोसले, अजय गुरव, तुषार बाबर, निलेश जांभळे, शंकर पांचागणे यांनी ही कारवाई केली.







