सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – शासनाकडून मंजूर झालेले धान्य रेशन दुकानात देण्यासाठी पुरवठा विभागातील अधिकार्यांना द्यायचे आहेत, असे सांगत सात हजार रुपयांची मागणी करणार्या बुधगाव (ता. मिरज) येथील नंदकुमार बाळकृष्ण पांडेजी या रेशन धान्य दुकानदाराला अटक करण्यात आली. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
दरम्यान पांडेजी याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, येथील एका रेशन धान्य दुकानदाराला शासनाकडून धान्य मिळालेले नाही. संबंधित दुकानदाराने पांडेजी यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. “पुरवठा विभागातील धान्य वितरण अधिकार्यांना पैसे द्यावे लागतात. ते दिल्यानंतर तुमचे काम पूर्ण करतो” , असे सांगितले. त्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने याबाबत येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पडताळणी केली असता तक्रारदार यांचे शासनाकडून मिळणारे धान्य मंजूर करण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. अन्नधान्य वितरण अधिकार्याची याला संमती आहे का याबाबात पडताळणी केली असता त्यात अधिकार्यांनी लाचेची मागणी केली नसल्याचे समोर आले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पांडेजी याच्याविरुध्द सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, अविनश सागर, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, राधिका माने, बाळासाहेब पवार यांचा या कारवाईत सहभाग होता.







