ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू होणार असून मुख्य सचिवांनी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शाळांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत अशा सूचना देत शाळा सुरू होण्याचा मुहूर्त राज्य सरकारने पक्का केला आहे.
22 नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांना कोविड आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. हे प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे लागणार आहे. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत या शिक्षकांना उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी ही चाचणी वेळेत करावी तसेच यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सुविधा उपलब्ध कराव्यात, अशाही सूचना सरकारने दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती असणार आहे. आजारी असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये, विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती ही पालकांच्या संमतीवरच असणार आहेत. त्यामुळे पालकांनीही गोंधळून जावू नये असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.
मात्र अकरावीचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेशप्रक्रिया थांबली. ती अजूनही सुरू झालेली नाही. त्यामुळे येत्या सोमवारी अकरावीचे वर्ग भरणार नाहीत हे नक्की. त्यामुळे अकरावीच्या विद्यार्थ्यांची संभ्रमावस्था कायम राहणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात मार्गदर्शन सूचनांचे परिपत्रक 10 नोव्हेंबर रोजी जारी केले आहे. या परिपत्रकानुसार शाळा व्यवस्थापकांना शाळा सुरु करण्याच्या आहेत. शिक्षकांनीही चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. शाळा खुल्या मैदानात, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे. ऑनलाईन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवा असेही सूचना अगोदरच शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
कोरोनाची दुसरी लाट आणि राज्यभरातून शिक्षकांचा अपुर्या सेवा-सुविधांमुळे होणारा विरोध यामुळे शाळा सुरू होणार आहेत की नाही याबाबत पालकांत संभ्रम वाढला आहे. शाळा सुरू होणार नाहीत अशा अफवाही काही ठिकाणी पसरत आहेत. मात्र सरकारने शाळा सुरू करण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्य सचिव संजय कुमार यांनी गुरुवारी मंत्रालयात ऑनलाइन बैठक घेऊन आढावा घेतला.







