नवी दिल्ली – देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. राज्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक राज्यांनी कोरोनाच्या निर्देशांचे पालन करत योग्य ती काळजी घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शाळा सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हरियाणातील तीन जिल्ह्यांमध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे हरियाणातील शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, मिजोराम आणि उत्तराखंडमध्येही कोरोना संक्रमण वाढल्याने शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
हरियाणातील तीन जिल्ह्यांमध्ये 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 9 ते 12 वीतील या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यातील काही विद्यार्थी होम आयसोलेशनमध्ये आहेत. रेवाडीतील 13 शाळेतील 91 विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले असून जिंदमधील शाळांमध्ये 30 विद्यार्थी आणि 10 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर झज्जर जिल्ह्यात दोन शिक्षक आणि 34 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हरियाणात 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.
गुजरातमध्ये 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार होत्या. मात्र, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्येही विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने आठवड्याभरासाठी शाळा बंद करण्यात आल्या होत्या. 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यात शाळा बंद राहणार आहेत. मिजोराममध्ये दोन खासगी शाळांमधील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण झाल्याने राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये शाळा सुरू केल्यानंतर पाच दिवसातच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पौढी गढवाल येथील 23 शाळांतील काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला. आंध्र प्रदेशमध्ये 879 शिक्षक आणि 575 विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. शाळा सुरू केल्यावर कोरोना चाचणी करण्यात आल्याने संख्या वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये शाळा सुरू आहेत. तर ओडिसामध्ये 16 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता ओडिशामध्ये 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत.
तामिळनाडूत आणि कर्नाटकातही शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत.तामिळनाडूमध्ये 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 16 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार होत्या. मात्र, अनेक पालकांनी चिंता व्यक्त केल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आता 2 डिसेंबरपासून कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे काही राज्यात शाळा सुरू करून बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना परिस्थितीचा अंदाज घेत राज्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.







