अहमदनगर (प्रतिनिधी वाजिद शेख) – संगमनेर शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कत्तलखान्याकडे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी लक्ष घातले आहे.काल शहरातील मदिनानगर येथे कत्तलखान्यावर कारवाई करून 4 हजार रुपये किंमतीचे 20 किलो गोमांस व 50 हजार रुपये किंमतीची 3 जनावरे शहर पोलिसांनी जप्त केली आहेत.
संगमनेर शहरात अनेक वर्षांपासून खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने चालू आहेत. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास कायद्याने बंदी असतानाही संगमनेरात मात्र या कायद्याची भीती कत्तलखाना चालकांमध्ये दिसत नाही. शहरातील जमजम कॉलनी, मदिनानगर, जोर्वे रोड आदी परिसरात अवैध कत्तलखाने सुरू आहेत. संगमनेर शहर हे मांस विक्रीचे राज्यातील प्रमुख केंद्र म्हणून पुढे येऊ लागले आहे.
शहरातील मदिनानगर येथे निसार कुरेशी हा पत्र्याच्या शेडमध्ये चोरून जनावरांची कत्तल करत आहे अशी खबर शहर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक देशमुख, पोलीस नाईक महाजन, हेड कॉन्स्टेबल डोंगरे, कॉन्स्टेबल गाडेकर, धुमाळ यांनी निसार याच्या शेडमध्ये छापा टाकला. या छाप्यात 20 किलो गोमांस, तीन बैल, दोन गायी असा एकूण 54 हजारांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी पंचनामा करून निसार कुरेशी याला ताब्यात घेतले.
पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यानी याबाबतची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 2003/2020 नुसार प्राणी संरक्षण कायदा कलम 1995चे सुधारीत कलम 2015 चे कलम 5 (ब), 5 (अ), 1/9 व प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निसार कुरेशी याला अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक सलीम शेख करत आहेत.
संगमनेरात जोमाने सुरू असणारे अवैध कत्तलखाने पूर्णपणे बंद करण्यात येतील. यापुढे जो कोणी कत्तलखाना चालविण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात येतील असा इशारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिला.
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारल्यानंतर पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी अवैध व्यवसाय करणार्यांबाबत कडक भूमिका घेतली आहे. ज्या कत्तलखाने चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे अशा कत्तलखाना चालकांचे तडीपाराचे प्रस्ताव देखील पाठविण्यात येणार असल्याचे सुतोवाच देशमुख यांनी केल्याने अवैध कत्तलखाने चालकांमध्ये घबराट पसरली आहे.







