अहमदनगर (प्रतिनिधी वाजिद शेख) – बुलढाणा जिल्ह्यातील तरुणाने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल बळीराम वनारे असे या तरुणाचे नाव असून तो माकनेर, ता. मलकापूर, जि. बुलढाणा येथील रहिवासी होता. त्याचे वडील बळीराम आत्माराम वनारे (वय 58) यांनी नेवासा पोलिसांना याबाबत खबर दिली.
राहुल हा हिंजवडी (पुणे) येथील मर्सिडीज बेन्झ कंपनीत नोकरीस होता. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता तो त्याच्या नातेवाईकांसमवेत पुण्याकडे कामावर जाण्यासाठी मलकापूर येथून निघाला होता.दुपारी पावणेचार वाजता त्याच्या बरोबर असलेला नातेवाईक सुहास वनारे याने फोन करून त्याच्या वडिलास सांगितले की प्रवरासंगम येथे गोदावरी नदीच्या पुलावर फोटो काढण्यासाठी थांबलो असता राहुल याने नदीपात्रात उडी मारली. त्याचा नदीपात्रात शोध घेत असताना 20 नोव्हेंबर रोजी राहुल याचा मृतदेह मिळून आला. या खबरीवरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.







