पाच एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सध्या या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव एसटी डेपोमध्ये दांगडो झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. काल रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पाच एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण (वय-37) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आलं आहे.
या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोयगाव एसटी डेपोच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण हे कर्तव्य बजावत असताना वाहक प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे व चालक रघुनाथ बारी, राजेंद्र भोपे हे पाच जण सकाळी 7 वाजता डेपोत आले. स्थानकप्रमुख कैलास बागुल यांच्या आदेशानुसार सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण यांनी पाचही जणांना प्रवेशद्वारावर रोखलं. त्याचा राग आल्यानं पाचही जणांनी सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला केला. पाच जणांनी लाठ्याकाठ्यांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पीडित सुरक्षारक्षकानं दिलेल्या तक्रारीवरून तीन वाहक आणि दोन चालक यांच्याविरुद्ध सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोयगाव डेपो परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीते, जमादार संतोष पाईकराव, सुभाष पाटील, रवींद्र तायडे, सागर गायकवाड करत आहेत.







