ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ट्रॉम्बे परिसरात वास्तव्यास असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस शुक्रवारी त्याच्या घरी गेले, मात्र पोलिसांना विजेचा झटका देऊन आरोपीने पळ काढला. या प्रकरणी पोलीस संबंधित आरोपीचा शोध घेत आहेत.
ट्रॉम्बे येथील चित्ताकॅम्प परिसरात राहणाऱ्या अब्दुल करीम ऊर्फ दुबई अक्रम (२७) या आरोपीवर मारहाण, लूट, चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनेक दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते.
दोन दिवसांपूर्वी अब्दुल घरी आल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले. मात्र त्याची कुणकुण लागताच अब्दुलने पोलिसांपासून सुटका करून घेण्यासाठी दरवाजाच्या कडीला विजेची वायर जोडली आणि विद्युतप्रवाह सुरू केला.एका पोलिसाने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याला विजेचा झटका बसला. तरीही पोलिसांनी दरवाजा तोडला. मात्र अब्दुलने घराचा पत्रा तोडून पलायन केले.







