नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध ३१ डिसेंबर पर्यंत वाढवले आहेत. भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात येणारी आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा अद्यापही पूर्ववत होणार नसल्याची माहिती डीसीजसीएकडून गुरुवारी देण्यात आली. पंरतू, यादरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत उड्डाणे सुरु राहतील. यापूर्वी आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली होती. डीजीसीएच्या आदेशानुसार केवळ निवडक उड्डाणांना परवानगी देण्यात येईल.
दरम्यान, डीजीसीएने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घातले असले तरी त्याचा फटका कार्गो सेवा तसेच अन्य परवानगी असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमानसेवेला बसणार नाही. परराष्ट्रीय मंत्रालयाने प्रवासी, मेडिकल तसेच ई व्हिसा वगळता इतर व्हिसा सेवा पूर्ववत केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची ये-जा सुरू आहे.
मार्च २०२० पासून देशातील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. २५ मे पासून देशांतर्गत उड्डाणे सुरु करण्यात आली आहेत. विदेशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी वंदे भारत मिशन चालवण्यात आले. अनेक देशांसोबत एअर बबल करार करण्यात आला. भारतीय एअरलाईन्सला ६० टक्के संचालनाची परवानगी देण्यात आली आहे. देशात वंदे भारत मिशन सुरु करण्यात आल्यानंतर २९ ऑक्टोबरपर्यंत २७ लाखांहून अधिक भारतीय दुसऱ्या देशातून भारतात परतले आहे.







