नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – एचपीसीएल कंपनीच्या वाहिनीला झडप लावून टँकरमधून डिझेल चोरीचा प्रकार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. तुर्भे उड्डाणपुलानजीक गेल्या अनेक दिवसांपासून ही चोरी सुरू होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात डिझेल विकत घेणाऱ्या पंपचालकालाही पोलिसांनी अटक केली आहे. भोलाप्रसाद यादव, बलदेव सिंग, जितेंद्र ऊर्फ जितूभाई यादव, केशव शेट्टी आणि सुरेश सपकाळ अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील भोलाप्रसाद सूत्रधार असून सुरेश सपकाळ चोरीचे डिझेल घेत होता.
पुणे ते मुंबई दरम्यान एचपीसीएल कंपनीची वाहिनी असून याद्वारे डिझेलचा पुरवठा होतो. सप्टेंबर महिन्यात कमी दाबाने डिझेल मिळत असल्याची तक्रार पुणे कार्यालयाने मुंबई कार्यालयात केली होती. मात्र पुरवठा व्यवस्थित होत असताना कमी दाबाने पुरवठा का होत आहे याबाबत तपास सुरू होता. यात एखाद्या ठिकाणी या वाहिनीला झडप लावून चोरी होत असल्याचही संशय होता. त्या अनुषंगाने कंपनीने आपली गस्ती पथकेही पाठवून शोध घेतला. यात सानपाडा पोलीस ठाणे हद्दीत तुर्भे उड्डाणपुलानजीक डिझेल चोरी होत असल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी सापळा रचला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान तांत्रिक तपासात भोलाप्रसाद याच्यावर संशय आला. त्याचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहतीच्या आधारावर पोलिसांनी सापळा लावत बलदेव सिंग, जितेंद्र ऊर्फ जितूभाई यादव, केशव शेट्टी या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून टँकर, मोबाईल फोन, इतर साहित्य असा ३ लाख २० हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
तुर्भे उड्डाण पुलानजीक एचपीसीएलच्या वाहिनीला छिद्र पाडून त्याला झडप लावण्यात आली होती. जेव्हा डिझेल चोरी केली जात असे तेंव्हाच झडप उघडली जात. त्यातून काढण्यात आलेले डिझेल थेट टँकरमध्ये टाकून बुलढाणा येथील एका इंधन पंपाला विकले जात होते. त्या पंपाचे व्यवस्थापक सुरेश सपकाळ यालाही अटक करण्यात आली आहे. यातील आणखी दोन आरोपी फरार आहेत. चोरीचा हा प्रकार कधीपासून सुरू होता, आतापर्यंत किती लिटरची चोरी झाली याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.







