अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपीला १० वर्षांची शिक्षा

sangali-crime

सांगली (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला सांगलीतील अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदाशिव भीमाप्पा मांग (वय ३२, रा. गोलभावी, ता. जमखंडी, जि. बागलकोट, कर्नाटक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तीन वर्षांपूर्वी जतमध्ये ही घटना घडली होती.

 

सरकारी वकील सूर्यकांत यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी जत येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. आरोपी सदाशिव मांग याने लग्नाचे आमिष दाखवून मुलीचे अपहरण केले होते. यानंतर वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत मुलीच्या वडिलांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी सदाशिव मांग याला अटक करून त्याच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.

 

सरकार पक्षाकडून सादर केलेले पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी कलम ३७६ नुसार आरोपीस दोषी ठरवले. त्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षांची शिक्षा सुनावली. पोक्सो कायद्यानुसार तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून कोर्टात आठ साक्षीदार तपासण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here