बलात्काराची केस मागे घेण्यासाठी ५० लाखांची मागणी

pune-50-lakh

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पतीच्या विरुद्ध दाखल असलेली केस मागे घेण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात लेखा लिपीक पदावर काम करणार्‍या एका महिलेकडे तब्बल ५० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर ५० लाखांची व्यवस्था केली नाही तर पती प्रमाणेच मुलांना देखील केसमध्ये अडकविण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

 

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एका ४७ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन जाधव व एक महिला अशा दोघांच्या विरुद्ध खंडणीची गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फिर्यादी महिलेच्या घरी मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे पती महामंडळामध्ये सातारा जिल्ह्यात एसटी डेपो मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यांच्या पतीविरुद्ध औरंगाबाद डेपोमध्ये काम करणार्‍या एका वाहक महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केला होती. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती फिर्यादींच्या घरी आला. त्याने स्वत:चे नाव सचिन जाधव असे सांगितले. तो औरंगाबादहून आला असून तक्रार दाखल करणार्‍या महिलेचे नाव सांगून संबंधित महिला केस पाठीमागे घेण्यास तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी दोन दिवसांत ५० लाखांची व्यवस्था करा असे ही सांगितले.

 

त्यावेळी फिर्यादी महिलेने म्हटले की, त्या महिलेने माझ्या नवर्‍याला खोट्या आरोपामध्ये अडकविले आहे. मग आता कशाचे ५० लाख रूपये मागत आहे. यावर आलेल्या सचिन जाधव याने पैसे नाही दिले तर नवर्‍याला जसे गुन्ह्यात अडकविले तसेच मुलांना देखील अडकविण्याची धमकी दिली. याशिवाय तडजोड करायची असेल तर ५० लाखांची तयारी ठेवा आणि पोलिसात गेलात तर जिवे ठार मारण्याची धमकीही दिली आहे. यापुर्वी देखील तक्रारदार वाहक महिलेने धमकी आणि शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here