पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कर्जाची रक्कम फेडल्यानंतर देखील आणखी पैशाची मागणी करत एका व्यवसायिकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वात गंभीर म्हणजे व्यावसायिकाला नग्न करुन पट्ट्याने जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर याचा व्हिडिओ बनवून पैसे न दिल्यास तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ तिघांना अटक केली आहे. अविनाश कांबळे (वय २८, रा.टिंगणेनगर), तुषार शेळके, तानाजी जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लोहगाव येथील ३६ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली असून ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादीचा रॉयल सोल्यूशन नावाने टेली मार्केटींगचा व्यवसाय आहे. त्याने अविनाश कांबळेकडून पाच लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज त्याने फेडले होते. मात्र त्यानंतर देखील अविनाश त्यांच्याकडे आणखी पैशाची मागणी करत होता. मात्र मध्यंतरी लॉकडाऊन झाल्याने फिर्यादी व्याजाची रक्कम देऊ शकला नाही.
दरम्यान बुधवारी अविनाश हा व्यावसायिकाच्या कार्यालयाखाली आला. त्याने व्यावसायिकाला खाली बोलावून घेतले. यानंतर त्याला दुचाकीवर बसवून कळसगावातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याला कपडे उतरवण्यास लावून तुषार व तानाजीच्या मदतीने कमरेच्या पट्टयाने मारहाण केली. हा सर्व प्रकार मोबाईलवर चित्रीत करण्यात आला. त्यानंतर पैसे न दिल्यास हे चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहेत.







