शहीद जवान यश देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

yash-deshmukh-manvandana

चाळीसगांव (विशेष प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी आणि मराठा रेजिमेंट बटालियनचे जवान श्रीनगर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ नोव्हेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांना शनिवारी २८ रोजी शासकीय इतमामात सकाळी ११.५३ वाजता मानवंदना देऊन अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी उपस्थितांसह मान्यवरांना गहिवरून आले होते.

 

पिंपळगाव येथील यश दिगंबर देशमुख (वय २१) हे श्रीनगर येथे तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री नाशिक येथे विशेष विमानाने आणण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी ९ वाजता चाळीसगाव मधील त्यांच्या गावात पिंपळगाव येथे आणण्यात आले. सुरुवातीला यश देशमुख यांच्या घरी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर जवानांनी त्याच्या शरीराभोवती तिरंगा लपेटून त्यांचे पार्थिव वाहनावर ठेवले. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा अंत्यविधीच्या स्थळापर्यंत नेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन त्याला मानवंदना दिली. याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, चाळीसगावचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी सभापती पोपट भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बंदुकीच्या चार फैरी झाडून यश देशमुख यांना सैन्य दल व जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे अखेरची मानवंदना देण्यात आली. त्यांचा भाऊ पंकज देशमुख यांनी त्यांच्या देहाला अग्नीडाग दिल्यानंतर उपस्थितांना गहिवरून आले होते. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी शहीद वीर जवान देशमुख यांच्या परिवाराला महाराष्ट्र शासनाकडून एक कोटी रुपयापर्यंत मदत देण्यात येणार, अशी घोषणा केली. आहे. तसेच आ. मंगेश चव्हाण यांनी, गावांमध्ये वीर यश यांचे स्मारक होण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here