भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा जळगाव शाखेच्या वतीने भुसावळ तालुक्यातील माध्यमिक विभागातून कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक योगेश गांधेले यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून केलेल्या कामाची दखल घेऊन, त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा सर्वोत्कृष्ट समजला जाणारा पुरस्कार म्हणजे गुणवंत शिक्षक पुरस्कार राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने बहाल करण्यात आला आहे.
आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळावं व आपण करीत असलेल्या महान कार्य द्विगुणित व्हावे म्हणून प्रत्येक वर्षी तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करीत असतो. या दिनाला महत्त्व प्राप्त व्हावं तसेच आपल्या शिक्षक बांधवांच्या प्रामाणिक व विधायक कार्याची दखल घेतली जावी म्हणूनच प्रत्येक वर्षी हा पुरस्कार बहाल केला जात असतो. “काम हाच आमचा वशिला – गुणवत्ता हीच आमची मालमत्ता” या ब्रीद च्या अनुषंगाने भुसावळ तालुक्यातील माध्यमिक विभागातून गांधेले यांची निवड गुणवंत शिक्षक म्हणून केली आहे.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखेमार्फत तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांच्या २८ नोव्हेंबर या स्मृती दिनी ऑनलाइन प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक धनराज मोतीराय सर यांनी तात्यासाहेब ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना सांगितली. सालाबादाप्रमाणे जिल्हा शाखेच्या वतीने प्राथमिक व माध्यमिक विभागाचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून जळगाव डायट विभागाचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर राजेंद्र महाजन, प्रसिद्ध साहित्यिका व सांगली जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, चोपडा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक दोन्ही विभागाचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ व सूर्यकांत गरुड उपस्थित होते. संघटनेच्या प्राथमिक विभागाच्या जिल्हाध्यक्षा प्रभावती बावस्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष बी एन पाटील यांनी केले. मान्यवरांचे परिचय वाचन संघटनेचे महानगराध्यक्ष टी. बी. पांढरे यांनी केले. पुरस्कारार्थी यादी वाचन संघटनेचे सरचिटणीस रणजीत सोनवणे व सचिव गणेश बच्छाव यांनी केले. पुरस्कारार्थीच्या उपक्रमांची माहिती संघटनेचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद आठवले व प्राथमिकचे उपाध्यक्ष गोविंदा वंजारी यांनी उपस्थितांना करून दिली. संघटनेच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा छाया बैसाणे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. सदर कार्यक्रमास संघटनेचे माध्यमिक विभागाचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ सर यांचे मार्गदर्शन लाभले.







