मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – शिवसेना प्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने श्री हरिलाल भगवती रुग्णालयातील कोरोना महामारीच्या काळात सातत्याने रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. 
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस, शिवसेना प्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनिल चिटणीस, संजय वाघ, महेश गुरव, वृषाली परुळेकर, विधानसभा संघटक बाळकृष्ण ढमाले, शाखाप्रमुख भुपेंद्र कवळी. शाखासंघटक ममता मसुरेकर उपस्थित होते.
कार्यक्रमात कोविडमुळे शहीद झालेल्या भगवती रुग्णालयातील दिवंगत परिचारिका हेमांगी कदम यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवती रुग्णालयातील स्थानिक पदाधिकारी सचिन सांगळे, जगदिश चव्हाण, अतुल आढे, मीना रजपूत, शिल्पा राऊत यांनी परिश्रम घेतले.

कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्या बरोबर शिवसेना विभागप्रमुख व आमदार म्हणून या नात्याने मी सातत्याने संपर्कात आहे. या काळातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची वागणूक ही देवदूताप्रमाणेच होती. त्यामुळे भगवती रुग्णालयात दाखल झालेले असंख्य कोरोना रुग्ण नुसतेच बरे झाले नाहीत, तर त्यांच्या चेहऱ्यावर चांगली रुग्णसेवा मिळाल्याचे समाधान होते. असे गौरवोद्गार शिवसेना विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आयोजित कोविड योद्धा सत्कार सोहळ्यात काढले.







