नाशकात ९४ लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त

illegal-liquor-stock
संग्रहित छायाचित्र

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – नगर – मनमाड मार्गावरील पिंपळगाव जलाल शिवारात शुक्रवारी (दि.4) रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा मारून दहा चाकी वाहनातून बेकायदा वाहतूक केली जात असलेला तब्बल 94 लाख रूपये किमतीच्या मद्यसाठा जप्त केला आहे. तर शहादा जि.नंदूरबार येथील दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 

 

संजय साहेबराव पाटील (36) व काशिनाथ बुधा पाटील (43 रा.सालदार नगर,जुना प्रकाशा रोड,शहादा) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार नगर – मनमाड मार्गावरून मोठ्या प्रमाणात मद्याची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली होती.

 

 

त्यानुसार शुक्रवारी रात्री पिंपळगाव जलाल शिवारातील येवला टोल नाका भागात निरीक्षक रूषीकेश फुलझळके,दुय्यम निरीक्षक एस.एस.रावते,निरीक्षक डी.एन.पोटे,जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके,भाऊसाहेब घुले,लोकेश गायकवाड आदींच्या पथकाने वाहन तपासणी सापळा लावण्यात आला होता. भरधाव येणार्‍या (एमएच 04 डीएस 2928) या दहाचाकी मालट्रक अडवून तपासणी केली असता हा मद्यसाठा पथकाच्या हाती लागला.

 

 

पथकाने वाहन तपासणी केली असता त्यात ब्ल्यु क्रेशर,ब्लॅक पॅशन,रॉयल रायडर व्हाईट मॅजीक,रॉयल स्टॅग,रॉयल चॅलेंज,इंपेरिअल ब्ल्यू,रॉयल रायडर रेअर ओक,रॉयल डबल,इंपेरिअल वॅट नं.1 आदी प्रकारच्या विदेशी मद्याने भरलेली खोकी मिळून आली.

 

पथकाने वाहनासह मद्यसाठा असा सुमारे 93 लाख 63 हजार 420 रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयीतांच्या अटकेने बेकायदा मद्यवाहतूकीचा भांडाफोड होण्याची शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. अधिक तपास विभागीय पथकाचे निरीक्षक आर.एम. फुलझळके करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here