नंदुरबारात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू

nandurbar-girl

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील नेहरुनगर परिसरातील एका सहा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. गेल्या आठवडाभर सदर चिमुकली सुरत येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील नेहरुनगर परिसरात मुकेश रमेश महाजन हे राहतात. त्यांची कन्या हिताशी (वय 6) ही मागच्या आठवडयात अंगणात खेळत होती. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने तीच्यावर हल्ला करत तोंडाला, मानेला चावा घेत काही अंतरापर्यंत ओढून नेले.ही बाब परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कुत्र्याला हुसकावले. मात्र कुत्रा त्यांच्या अंगावरही धावून येत होता.

 

 

नागरिकांनी त्याला घेरल्यावर मुलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले. मात्र तोपर्यंत कुत्र्याने तिच्या गालासह शरीरातील अनेक ठिकाणी लचके तोडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत हिताशीला तिचे वडील मुकेश महाजन व परिसरातील नागरिकांनी तत्काळ जिल्हा रूग्णालयात नेले. तत्काळ रॅबिजचे इंजेक्शन व पुढील औषधोपचार सुरू केले.मात्र तिची प्रकृती खालावत गेली. दोन दिवसानतर डॉक्टरांनी सुरत येथे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार बालिकेला सुरत येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे तीन दिवसापासून उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असतांना या बालिकेचा आज करुण अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here