मुंबई (उपसंपादक प्रशांत भिसे) – बँक ऑफ बरोडा बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून फिर्यादी यांच्या बँक खाते बंद होणार असल्याचे खोटे सांगून फिर्यादी यांच्या खात्यातील 5 लाख 84 हजार रु इतकी रक्कम परस्पर बँक बरोडा त्यानंतर पे टी एम मध्ये वळवून फसवणूक केल्याबद्दल वडाळा टीटी पोलीस ठाणे येथे गु .र. क्र.381/2020 कलम 419,420 भा द वि सह 66(क)(ड)आयटी कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या आदेशाने वडाळा टी टी पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्याच्या तपासकामी झारखंड येथे रवाना केले होते. फसवणूक करणाऱ्या आरोपीची माहिती घेत असताना आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हा 18 आय.एम .इ. आय. क्रमांकावर वापरण्यात आल्यानंतर त्या आय .एम. इ .आय. ची माहिती घेतली असता त्यावर 402 मोबाईल क्रमांक वापरण्यात आले होते. हे सिम कार्ड हे पश्चिम बंगाल येथील पत्त्यांवरील असल्याने नक्की त्यांचा ठावठिकाणा समजून घेण्यास अडचण निर्माण झाली होती. तसेच आरोपीचे बँक खाते हे गुजरात पत्त्यावरील असल्याने आरोपीने सदरचा गुन्हा हा नियोजनबद्ध केल्याचे दिसून येत होते.
पोलिस आरोपीचे मागावर होते मात्र आरोपीकडील मोबाईल फोन मधे 2G Frequency चे सिम कार्ड असल्याने त्याचे लोकेशन मिळणे कठिण झाले होते. या क्लिष्ट गुन्ह्याचा तपास तांत्रिक मदतीच्या साहाय्याने करून आरोपीचा ठावठिकाणा पोलिसांनी प्राप्त केला असता आरोपी हा राहाते घरी न राहता शेतामध्ये लपून राहत असल्याची माहिती मिळाली होती.स्थानिक पोलीस ठाण्याची मदत घेऊन आरोपीस .गाव -जोंका, पोस्ट- कर्मा, थाना-टालझारी, जिल्हा-डुमका,(झारखंड )येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी गंगाधर दुखन मंडल, (वय-21 वर्षे, रा ठी.गाव जोंका, पोस्ट कर्मा, थाना-टालझारी, डुमका,झारखंड) हा असून, या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला सॅमसंग कंपनीचा (1000 रु किमतीचा)मोबाइल,स्वतःच्या वापरासाठीचा एमआय कंपनीचा दुसरा मोबाईल फोन (6000रु), रोख रक्कम 40 हजार रु पंचनाम्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आली आहे.
ही कारवाई व गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण -सपोनि अजय बिराजदार, पी एन 34516/गायकवाड, पीसी 080067/पवार, पीसी 113444/जावीर यांच्या पथकाने ७-८ दिवस या ठिकाणी थांबून पूर्ण केला.







