ग्रेडर/केंद्रप्रमुख हातानेच मोजतात कापसातील आद्रता…!
भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – भुसावळ तालुक्यातील शिंदी व कुऱ्हे पानाचे येथे भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) मार्फत सौरभ ॲग्रोटेक जीनींग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूस खरेदीला १९ ऑक्टोबर रोजी सुरूवात करण्यात आली. तर कापसाच्या वाहनांची शेकडो प्रमाणात संख्या व कापसाची आवक पहाता कुऱ्हे पानाचे येथील सुशिला जिनिंग प्रेसिंग मध्ये कापसाच्या खरेदीला अखेर शनिवार (दि. ५) रोजी संध्याकाळी ४:३० वाजता सुरूवात करण्यात आली.
तालुक्यात तीन जिनिंग प्रेसिंग सुरू करण्यासाठी मान्यता असताना केंद्रप्रमुखाच्या आडमुठ्या धोरणामुळे दोनच जिनिंग प्रेसिंग सुरू करण्यात आल्या. त्या ही कुऱ्हे पानाचे येथील जिनिंग दोन दिवस तर शिंदी येथील जिनिंग आठवड्यातून एकच दिवस सुरू असल्याने आलेल्या कापसाच्या वाहनांची मोजणी होत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर चार ते पाच दिवस ताटकळत बसावे लागले. भाड्याने आणलेल्या वाहनांमुळे शेतकऱ्यांना खुटी स्वरूपात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्याचप्रमाणे आद्रता व कवळी च्या नावाखाली तीन ते पाच किलो प्रति क्विंटल अवैधरित्या कपात(कट्टी) करण्यात येत आहे.
कापसातील आद्रता पाहण्याचा दहा वर्षाचा अनुभव.
माझा दहा वर्षाचा अनुभव आहे. कापसातील आद्रता/ ओलावा पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारची आद्रता मोजणी यंत्राची आवश्यकता नाही. माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आठवडाभरात जेवढा कापूस खरेदी केला जातो तेवढा मी दोनच दिवसात करतो. त्यामुळे दररोज कापूस खरेदी केला जाणार नाही. शेतकऱ्यांनी विरोध व आंदोलन करून काही फायदा होणार नाही.
(बी.के.नायर, ग्रेडर/केंद्रप्रमुख, सीसीआय)
ग्रेडर/केंद्रप्रमुख हाताने मोजतात कापसातील आद्रता…!
सौरभ ॲग्रोटेक जीनींग प्रेसिंग खरेदी केंद्रावर कापूसातील आद्रता पाहण्यासाठी केंद्रप्रमुखाजवळ कोणताही प्रकारचे आद्रता मोजणी यंत्र नाही. त्यामुळे “मन करे सो कायदा” या उक्ती प्रमाणेच कोणाच्या कापसाला काय आद्रता लावायची? किती कट्टी लावायची? तोंड पाहून कापसातील आद्रता केंद्रप्रमुख लावत आहेत. असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याची वरीष्ठ पातळीवर दखल घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान थांबवावे व दुसऱ्या व्यक्तीची केंद्रप्रमुख म्हणून निवड करावी. पण शेतकऱ्यांनी विरोध केल्यास केंद्र बंद होईल अथवा शेतकऱ्यांचा कापूस मोजणी होणार नाही, अशी शेतकऱ्यांमध्ये कुजबुज चालू आहे.
अवैध रीतीने वाहनांची मोजणी; शेतकऱ्यांचा आरोप
कापसाची वाहने रांगेत उभे असताना दिवस-रात्र वाहने येत आहेत. परंतु त्याठिकाणी बाजार समितीचा कोणताही व्यक्ती नसल्याने मागील वाहने पुढे जाऊन त्यांचा नंबर अगोदर येत आहे. तर काही व्यापारी व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने त्यांची वाहने अगोदर मोजली जात आहे. त्या ठिकाणी नियमित कर्मचारी हवा, जिनिंग आठवड्यातून दोनच दिवस सुरू असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. थंडीच्या दिवसात रात्री वाहनांजवळ थांबावे लागत असल्याने कापसाच्या अवैधरित्या कपातीचे आर्थिक नुकसानीसह शारीरिक व मानसिक हाल शेतकऱ्यांचे होत आहे. त्यामुळे आठवड्यात दोनच दिवस खरेदी न करता नियमित दररोज खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.







