जळगाव (संपादक सुनिल पाटील) – राज्याचे आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त आणि उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह आढळला असून त्यांच्या अंगावर मारहाण केल्याचे व्रण आणि त्यांचे कपडे फाटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने, त्यांचा घातपात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत समजलेले वृत्त असे की, किशोर पाटील कुंझरकर आज बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह पलासदळ गावाजवळ हॉटेल फौंटनच्यामागे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा तपास सुरु असून राज्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे आणण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यानंतर पुढील माहिती मिळू शकणार आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले की, मृतदेह रुग्णालयात असून शवविच्छेदन करणे बाकी आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. तोवर पोलीस इतर चौकशी करीत आहेत. किशोर पाटील यांच्या अंगावरील कपडे फाटलेले आढळून आले आहेत. त्यामुळे हा घातपात आहे का किंवा त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय हे शवविच्छेदन अहवालातून समजू शकणार आहे.
किशोर पाटील हे गालापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. ते भुसावळ येथे अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास गेले होते. किशोर पाटील हे विविध संघटनांशी निगडीत होते. मराठा महासंघावर नुकतीच त्यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली होती. किशोर पाटील व त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक असून, कोरोना काळात आदिवासी वस्तीवर ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत असताना अडचणींवर मात करीत किशोर पाटील कुंझरकर व त्यांच्या अर्धांगिनी शिक्षिका जयश्री पुरुषोत्तम पाटील यांनी “घर…घर..शाळा – शिक्षण, आपल्या दारी” हा उपक्रम राबवून आदिवासी वस्ती पर्यंत शिक्षण पोहचविले होते. त्यांच्या मृत्यूबद्दल शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







