नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून संपूर्ण क्षमतेने काम करण्याचे सूचित करीतअभियानाशी संबंधित प्रत्येक संवर्गाच्या कार्य जबाबदारीविषयी विस्तृत माहितीसह अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी सादरीकरण केले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांनी विशेष बैठकीत केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जागेवर करावयाच्या कामांविषयी आयोजित चर्चात्मक बैठकीप्रसंगी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, परवाना विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, शिक्षण विभागाचे उपआयुक्त श्री. योगेश कडुस्कर हे नोडल अधिकारी तसेच सर्व विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक, सहा. उद्यान अधिकारी उपस्थित होते.
सर्वेक्षण आपल्याला नवीन नाही, मात्र स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने त्याकडे प्रत्येक क्षणी लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे स्वच्छता ही अभियानापुरती नाही तर ती नागरिकांची दैनंदिन सवय व्हावी यादृष्टीने प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहभागाशिवाय संपूर्ण स्वच्छता ही अशक्य गोष्ट असून स्वच्छतेमध्ये नागरिकांची सक्रीय कृतीशीलता अपेक्षित आहे. त्याकरिता नागरिकांमध्ये स्वच्छतेची मनोभूमिका तयार करण्यावर विशेष लक्ष द्यावे असे अति. आयुक्त यांनी यावेळी सूचित केले.
घरोघरी कच-याचे ओला, सुका व घरगुती घातक अशा प्रकारे 100 टक्के वर्गीकरण करण्यात यावे, तशाच प्रकारे वेगवेगळे संकलन आणि वाहतुक करण्यात यावी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो अशा सोसायट्या, संस्था यांना त्यांच्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राबविण्यास प्रोत्साहीत करण्याचे उपस्थितांना सूचित करण्यात आले. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करावयाच्या प्रत्येक बाबींवर टूल किटच्या अनुषंगाने विस्तृत माहिती देण्यात आली व कामाची निश्चित दिशा स्पष्ट करण्यात आली.







