कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यास जात असताना ताफ्यातील गाड्यांवर हल्ला झाला. जे. पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या तयारीसाठी जे. पी नड्डा राज्यात आले आहेत.
भाजपा नेते मुकूल रॉय आणि कैलाश विजवर्गीय हा दगडफेकीत जखमी झाले आहेत. लोकशाही देशासाठी ही लज्जास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया जे. पी नड्डा यांनी हल्ल्यानंतर दिली आहे. माध्यम प्रतिनिधींच्या गाड्यांवरही हल्ला झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
डायमंड हार्बर येथे जात असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमचा रस्ता अडवला आणि नड्डा यांच्या गाडीवर आणि ताफ्यातील इतर गाड्यांवर दगडफेक केली. यातून टीएमसीची मानसिकता दिसून येते, असे बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष म्हणाले. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत गाड्यांना सुखरूप जाण्यास रस्ता करून दिली.
बुलेट प्रूफ गाडीमुळं बचावलो
भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा म्हणाले, कैलाश विजवर्गीय, राहुल सिन्हा यांना पाहा, त्यांच्या गाड्या पाहा. मी बुलेटप्रूफ गाडीत असल्याने सुरक्षित राहिलो. नाहीतर अशी एकही गाडी राहीली नसती जिच्यावर हल्ला झाला नाही. ही गोंधळाची स्थिती जास्त काळ राहणार नाही. ममता बॅनर्जी यांची सत्ता लवकरच जाणार असून बंगालमध्ये कमळ फुलणार आहे. बंगालमधील पोलीस आणि प्रशासनावर राजकीय प्रभाव वाढत असल्याचा आरोप जे. पी नड्डा यांनी तृणमूल काँग्रेसवर केला. हे सर्व आम्ही थांबवणार असून बंगामध्ये कमल फुलवणार असल्याचे नड्डा म्हणाले.







