चंदिगड – शेतकरी कायद्याचा देशभर विरोध होत असताना राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारचा विरोध होत आहे. त्यात भाजपासोबत सत्तेत असलेल्या जननायक जनता पार्टीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी कायदे केले, त्याला देशभरातून विरोध होत आहे. पंजाब-हरयाणामधील शेतकरी आंदोलन करीत आहेत. चर्चेच्या फेऱ्या होत आहेत, मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यातच आता हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी राज्यातील भाजपा सरकारला इशारा देत पाठिंबा काढण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे अप्रत्यक्ष सांगितले आहे.
एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ही शेतकऱ्यांचा अधिकार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे मला आशा आहे, की सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करेल. शेतकरी आंदोलन मागे घेतील. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. हे करण्यास आम्ही अक्षम ठरल्यास राजीनामा देण्यास तयार आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राज्य सरकार स्थिर असल्याचे म्हटले आहे. मागील ७ महिने आम्ही सुसंवादाने सरकार चालवले आहे. पुढील चार वर्षे ते मजबूत स्थितीत राहील. जेजेपी आमदार राम कुमार गौतम यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यासंबंधी विचारले असता खट्टर यांनी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न असून सरकारमध्ये कोणतेही वाद नाहीत असे सांगितले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्याने राज्यामध्ये त्रिशंकू परस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा जननायक जनता पक्षाने भाजपला पाठिंबा दिला होता. भाजपला स्वत:चे 40 उमेदवार, 10 जेजेपी आणि सात अपक्ष, एकूण 57 आमदारांचा पाठिंबा आहे. हरयाणामध्ये ९० सदस्यांच्या विधानसभेत भाजपने ४० जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसने ३१ जागा जिंकल्या असून जननायक जनता पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत. याचबरोबर ७ अपक्ष उमेदवारांनीही विजयाची नोंद केली आहे.







