सांगलीत अल्पवयीन मुलाने केला ८ वर्षीय बालिकेचा विनयभंग

vishrambag-police-station

सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – सांगलीतील एका उपनगरात अल्पवयीन मुलाने आठ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार गुरुवारी दुपारी सार्वजनिक शौचालयात घडला. पीडित मुलीच्या आईने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.

 

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीतील एका उपनगरात पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसह राहते. गुरुवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास ती शौचासाठी सार्वजनिक शौचालयात गेली. याचवेळी एक अल्पवयीन मुलगा तिचा पाठलाग करीत शौचालयात घुसला. अश्लील हावभाव करीत त्याने मुलीशी गैरवर्तन केले. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर मुलगा पळून गेला. घाबरलेल्या मुलीने घरात गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडित मुलीच्या आईने याबाबत संशयित मुलाला जाब विचारला. मात्र, त्याने उलट उत्तरे देत वाद घातला.

 

 

पीडित मुलीच्या आईने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी तातडीने संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्याच्या सूचना त्यांनी विश्रामबाग पोलिसांना दिल्या. यानुसार पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्याची रवानगी बालसुधारगृहात केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here