मांडवा बंदरावर उतरणाऱ्या पर्यटकांची कोरोना चाचणी बरोबरच वाहन तपासणीकडे होतेय दुर्लक्ष

mandava

अलिबाग-सोगावकर:  मुंबईहून समुद्रमार्गे अलिबाग तालुक्यातील मांडवा येथील बंदरावर उतरणाऱ्या पर्यटकांची कोरोना चाचणीबरोबरच रोरो सेवेद्वारे येणाऱ्या वाहनांचीही तपासणी केली जात नसल्याने सुरक्षेच्या प्रश्नाबरोबरच कोरोनाचा प्रादूर्भाव अलिबागसह मुरुडमध्ये वाढू शकतो अशी भिती आपत्ती सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील यांनी  बोलताना व्यक्त केली. तशा प्रकारचे निवेदनही रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री अदिती तटकरे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुंबईहून समुद्रमार्गे एम.टू.एम. या कंपनीच्या बोटीद्वारे पर्यटकांना मांडवा बंदरात आणले आणि नेले जाते. साधारण एकावेळेस १४० वाहनांसह ५०० पर्यटक प्रवाशी वाहून ने-आण करणाऱ्या या रो-रो सेवेची सुरवात २० ऑगस्ट २०२० पासून झाल्यानंतर मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांची कोरोना चाचणी होत नसून, सुरक्षेच्या दृष्टीने रो-रो सेवेद्वारे येणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी स्कॅनर या यंत्राद्वारे होत नाही. त्यामुळे अलिबाग तालुक्यासह मुरुड तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याबरोबरच वाहनांची तपासणी होत नसल्याने या भागात कोणत्याही क्षणी घातपात होण्याची भितीही पाटील यांनी व्यक्त केली आहे.ro-ro-boat

रो-रो ज्यावेळी सुरू झाली, तेव्हा प्रत्येक फेरीनंतर बोट पूर्णपणे सॅनीटायझ केली जात होती. तसेच या बोटीतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटावर प्रवाशाचे तापमान व पल्सची नोंद देणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच हे पर्यटक तोंडाला मास्कही लावत नसल्याने अलिबागसह मुरुड भागात भाजीसह,मच्छी खरेदी करताना एखाद्याला कोरोना असल्यास त्याचा त्या भागात प्रादूर्भाव पसरू शकतो, असेही पाटील यांचे म्हणणे आहे.

 

सर्वात महत्वाचे म्हणजे विमानतळ तसेच मोठ्या कंपन्याच्या मुख्य द्वारावर चारचाकी वाहनांची खालून स्कॅनरद्वारे जशी तपासणी केली जाते तशी तपासणी पूर्वी मांडवा बंदरात होत होती. मात्र सध्या हे यंत्र बंद असल्याने आता अशी तपासणी बंद आहे. त्याकडे मेरीटाईम बोर्डाचेही दुर्लक्ष होत असल्याचा पाटील यांचा आरोप आहे. मांडवा बंदरावर पर्यटकांच्या बॅगा तपासणीसाठीच्या दोन स्कॅनिंग मशीन होत्या. त्याही बंद असल्याने पर्यटकांच्या बॅगांची तपासणीच होत नसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उरण बंदरातही पर्यटकांच्या बॅगा तपासणारी स्कॅनिंग मशीन नसल्याने तेथीलही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरी मेरीटाईम बोर्ड, रायगडच्या पालकमंत्री, रायगड पोलिसांनी याकडे लक्ष देऊन भविष्यात अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष देण्याची विनंती निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here