चित्रपटसृष्टीतील प्रगल्भ अभिनेत्री म्हणून ओळखली जायची ही खान्देशकन्या

    smita patil

    (योगेश शुक्ल)

    खान्देशकन्या असलेली चित्रपटसृष्टीतील प्रगल्भ अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज 13 डिसेंबर स्मृतिदिवस.
    रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील हिचं चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटीलने विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या.
    स्मिता पाटील ह्यांचा जन्म ऑक्टोबर १७, १९५५ साली पुणे इथे झाला. स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला.त्यांनी पुण्यातील रेणुका स्वरुप मेमोरियल माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले. त्यांचे वडिल शिवाजीराव गिरधर पाटील हे राजकारणी होते. त्यांच्या आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ‘बातम्यांची निवेदिका’ या नात्याने केली.

     

    छोटया पडद्यावरुन या भूमिकेवरुन तिचे सुप्त गुण हेरुन श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने तिला ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर’ या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन’ आणि ‘भूमिका’ या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिताला कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला.

    ‘मंथन मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या हरिजन स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील सळसळते चैतन्य, आक्रमकता आणि सचोटी याचा सशक्त आविष्कार केला. त्याचप्रमाणे हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित ‘भूमिका ‘ मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित ठरणार्‍या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या.

    वास्तविक हिंदी चित्रपटांमधुन प्रामुख्याने पारंपारिक स्त्री प्रतिमाच चितारल्या गेल्या. तरीही स्मिता पाटीलच्या उदयापूर्वी वहिदा रेहमान, नुतन , सुचित्रा सेन यांनी या चाकोरी पलीकडल्या काही प्रतिमा उभ्या केल्या. स्मिता पाटीलने ही धारा आपल्या अभिनय सामर्थ्याने दृढ केली आणि पुढेही नेली. दलित, शोषित स्त्रियांच्या , बंडखोर स्त्रियांच्या , आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकार केल्या. याबाबतीत शबाना आझमी या तिच्या समकालीन अभिनेत्रीनेही योगदान केलं आहे. या अभिनेत्रींनी प्रेयसीच्या रुढ झालेल्या प्रतिमांना पर्यायी अशा प्रतिमा सक्षमतेने आविष्कृत केल्या. वेगळया मूल्यचौकटी व निष्ठा घेऊन जगणार्‍या अशा व्यक्तिरेखांना या अभिनेत्रींनी एका अर्थाने मान्यताच मिळवून दिली.
    स्मिता यांनी स्‍त्रीप्रधान भूमिका करून वेगवेगळ्या विषयांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्‍यामुळे ‘मिर्च मसाला’मधील सोनबाई, ‘अर्थ’मधील कविता सान्‍याल महिलांना आपलीशी वाटली. मराठीतील ‘उंबरठा’ चित्रपटातील सुलभा महाजन म्‍हणजे जणूकाही आपल्‍या मनातली एक भावना आहे, असे त्‍याकाळी अनेक महिलांना वाटलं. समांतर चित्रपटांनंतर त्यांनी काही व्‍यावसायिक चित्रपटही केले. ‘शक्‍ती’, ‘नमकहलाल’ हे त्यांचे व्‍यावसायिक चित्रपटही सुप‍रहिट झाले. श्‍याम बेनेगल, रमेश सिप्‍पी, बी आर चोप्रा अशा प्रतिष्ठीत दिग्‍दर्शकांना स्मिता या आवडत्या अभिनेत्री होत्या.

    चित्रपटसृष्टीत असं महत्वाचं योगदान करणार्‍या स्मिता पाटील यांचे खासगी आयुष्य कायमच एक गूढ बनून राहिले. स्मिता यांच्यावर राज बब्बर आणि नादिरा बब्बर यांचा संसार उद्धवस्त केल्याचा आरोप लावण्यात आला होता. अभिनेता राज बब्बर यांच्याशी जवळीक वाढल्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यावेळी राज बब्बर विवाहित होते. नादिरा बब्बर या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. राज बब्बरसोबतचा संसार आणि तिची कारकीर्दही तिच्या अकाली मृत्यूमुळे अधुरी राहिली. प्रतिक बब्बर हा स्मिता आणि राज यांचा मुलगा आहे. प्रसूतीच्या वेळी स्मिता पाटील यांना ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांतच स्मिता या कोमात गेल्या होत्या. १३ डिसेंबर १९८६ रोजी प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या 15 दिवसाने वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी या सर्जनशील अभिनेत्रीचं निधन झालं. पण मृत्यूनंतरही मास्को, न्यूर्यॉक , फ्रान्समधील विविध महोत्सवांमध्ये तिच्या चित्रपटांचं ‘सिंहावलोकन ‘ झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी मान्यता मिळणारी ती पहिलीच भारतीय अभिनेत्री ठरली.
    – योगेश शुक्ल ९६५७७०१७९२

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here