ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुरबाड मतदार संघातील भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या कारने एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर असल्याचे समोर आले आहे. हि घटना मुरबाड तालुक्यातील दहागाव आपटी रस्त्यावर घडला असून घटनास्थळी कल्याण तालुका पोलीस दाखल झाले आहेत.
आमदाराची कारही क्षतिग्रस्त होऊन समोरचा भागाचा चेंदामेंदा झाला आहे. मात्र कारमधील जखमी आणि मृत दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही. तर दुचाकीवरील दुसरी महिला गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू होऊन दुचाकीवरील महिला रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात उडून पडली होती. त्यामुळे तीही गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुरबाड मतदारसंघातील आमदार किसन कथोरे हे पूर्व नियोजित कार्यक्रम आटोपून कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी 6 वाजून 45 वाजता अनखर पाडा, गोवेली, वाहोली मार्गे बदलापूरकडे येत होते. त्यावेळी त्यांच्या कारला समोरून मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुण अमित नंदलाल सिंग (वय २२ रा, नेतेवली, कल्याण) याचा जागीच मृत्यू झाला तर सिमरन दीपक सिंग ( १८, नेतेवली, कल्याण) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आमदार किसन कथोरे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी कल्याण तालुका पोलीस पंचनामा करून अपघाताची नोंद करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.







