नवी दिल्ली – बऱ्याच दिवसानंतर सोन्याच्या दरात मंगळवारी भक्कम वाढ झाली. मंगळवारी सोन्याचे दर 514 रुपयांनी वाढून 48,847 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेले. त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 1,046 रुपयांनी वाढून 63,612 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढले. याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे आणि जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे भारतीय बाजारात सोने घसरले.
मोतीलाल ओसवाल फायनान्सियल सर्व्हिसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, अमेरिकेत पॅकेज जाहीर होण्यास उशीर होत असल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ झाली. करोनावरील लस किती परिणामकारक ठरेल यावर आगामी काळात विविध बाजारातील घडामोडी अवलंबून राहतील असे सांगण्यात आले.







