कर्जाच्या बहाण्याने फसविणारी टोळी गजाआड

fake-loan

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कर्जाच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा खडक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चेन्नई येथून दोघांच्या मुसक्‍या आवळल्या असून, त्यांच्या ताब्यातून मर्सिडीज बेंझ, इनोव्हा या महागड्या चारचाकींसह चार मोबाइल असा 80 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. यातील मुख्य आरोपी मात्र फरार झाला आहे.

 

 

व्ही. एम. महंमद दाऊद खान (28), आर. कार्तिक रविकुमार (32, दोघेही रा. पन्नायूर, चेन्नई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आधी पुण्यातील दोघा एजंटांना अटक करण्यात आली होती. आरोपींनी पुण्यातील एकाची 25 कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने दीड कोटी रुपयांची फसवणूक केली होती.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “यातील फिर्यादीचा टॅक्‍स ऍन्ड बिझनेस कन्स्ल्टन्सीचा व्यवसाय आहे. 25 कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याने, त्यांनी पंकज पांडे याच्याशी संपर्क साधला होता. पांडेने जयंत गायकवाड, सात्विक चंद्रशेखर, अविनाश गुराप्पा, समीर अली यांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. यापोटी त्याला कमिशन मिळणार होते. हे सर्व जण चेन्नई येथे गेले.

 

 

तेथे मुख्य आरोपी समीर मोहंमद अलीने कर्ज देण्याचा बहाणा करत 1 कोटी 52 लाख रुपये ऍडव्हान्स जमा करण्यास सांगितले. ही रक्कम एका आलिशान बंगल्यातील कार्यालयात स्वीकारण्यात आली. त्यांनी फिर्यादीच्या सेवेत एक आलिशान कारही ठेवली होती. मात्र, नंतर कर्ज न देता फसवणूक केली.

 

 

तक्रार दाखल झाल्यावर खडक पोलिसांचे पथक चेन्नईला रवाना झाले होते. तेव्हा आरोपींचा पत्ता आणि नावे सर्व खोटी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांचा शोध लागत नव्हता. मात्र ,त्यांच्या गाडीच्या नंबरवरून आरोपींचे खरे नाव व पत्ता शोधण्यात आला. यानंतर खडक पोलिसांच्या एका पथकाने पुन्हा चेन्नईला जाऊन दोघांना अटक केली. मात्र, मुख्य सूत्रधार समीर मोहंमद अली फरार झाला.

 

या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, तपास पथकाचे उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, पोलीस अंमलदार बंटी कांबळे, समीर माळवदकर, अमेय रसाळ, संदीप पाटील, राहुल मोरे यांच्या पथकाने केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here